वाळुज महानगर – घराला कुलूप असल्याचे हेरून अज्ञात आरोपीतांनी चार बंद घरं व एक ग्रामपंचायत कार्यालय अशा 5 ठिकाणचे कुलूप तोडून चोरी झाली. वाळुज परिसरातील करोडी येथे घडलेली ही घटना शनिवारी (ता.24) सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. मात्र यात नेमका किती ऐवज किंवा ग्रामपंचायतच्या महत्त्वाच्या फायली चोरीला गेल्या. याबाबतची माहिती मिळू शकली नाही. परंतु या चोरीची मात्र दबक्या आवाजात कुजबुज सुरू आहे.
वाळूज औद्योगिक परिसरातील करोडी गावातील मुख्यरोड असलेले ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. विशेष म्हणजे यावेळी चोरट्यांनी ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड करून डीव्हीआर समजून दुसरेच साहित्य चोरून नेले. या ग्रामपंचायतच्या पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपल्याने येथे प्रशासक म्हणून डी एन मगर तर ग्रामसेवक आर बी निकम हे काम पाहतात. याबाबत निकम यांनी सांगितले की,
ग्रामपंचायत कार्यालयातील कपाटामध्ये फिल्टर प्लांटचे दहा ते बारा हजार रुपये रोख होते. याशिवाय महत्त्वाची कागदपत्रे व फायलीही आहेत. मात्र ठसे तज्ञ येणार असल्याने पोलिसांनी कोणत्याही वस्तूला हात लावण्यास मनाई केली. त्यामुळे कपाटात ठेवलेली रक्कम तसेच महत्त्वाच्या फायली चोरीला गेल्या किंवा नाही. याबाबत ठाम सांगता येणार नाही. असे ग्रामसेवक निकम म्हणाले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासह जवळच असलेले सुरेश यशवंत जाधव यांच्या भाड्याने दिलेल्या दोन खोल्या, ज्ञानेश्वर विठ्ठल गीते व अनंत रघुनाथ जाधव अशा चार ठिकाणच्या घरांच्या कुलपा तोडून चोरी करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच दौलताबाद ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गीते गोवर्धन चव्हाण सुनील पठारे अविनाश बर्वंत तसेच गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब जोंधळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नजीर पठाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश नवसरे, पोलीस अंमलदार के के आधाने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्याचप्रमाणे स्वान पथकाचे मच्छिंद्र तनपुरे, अनिल जवळकर, एस जी गोरे यांनीही टिपू या स्वानासह घटनास्थळी आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यातील आरोपी हे दुचाकीवर गेल्याने स्वान ग्रामपंचायत कार्यालयाजवळच घुटमळले.
चोरीची गावात चर्चा –
वाळूज परिसरातील करोडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरेची मोडतोड करून चोरी करण्यात आली. या चोरीत काही महत्त्वाच्या फायली गायब करण्यात आल्या असाव्यात. अशी कुजबुज सुरू आहे. विशेष म्हणजे येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ समाप्त झालेला असून येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.