
वाळुज महानगर, (ता.13) – आईने दिलेले उसने पैसे मागण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय अर्जुनला मारहाण केली. त्यामुळे त्याने दगडाच्या फरशीचा तुकडा फेकून मारल्याने जखमी झालेल्या महिलेच्या मुलासह सात जणांनी बांबुची काठी, लिंबाची ओली काठी, कंबरेचा बेल्ट, नारळाचा फंटा व ईलेक्ट्रीक केबल वायरने मारहाण करुन अर्जुनला जिवे ठार मारले. शुक्रवारी 11 जुलै रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुम्राज घडलेली ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. 
याबाबत करण रतन प्रधान याच्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, करण व अर्जुन दोघे भाऊ आहेत. दोघेही वाळूज येथील बडवे इंजिनिअरिंग कंपनीत काम करतात. शुक्रवारी 11 जुलै रोजी सकाळी करण हा कंपनीत कामाला गेला होता. तर अर्जुन घरीच होता. दुपारी 12 वाजेच्या सुमारास अर्जुन याने करणला फोन करून सांगितले की,
गावातील पांडू प्रधान व त्याचे साथीदार मला मारहाण करत आहे. मारहाणीचे कारण विचारले असता अर्जुनने सांगितले की, पांडू प्रधान याचा भाऊ रामसिंग याला आई विमलबाईने 10 हजार रुपये उसने दिलेले आहे. ते पैसे आणण्यासाठी मी गेलो असता, त्यांनी मला मारहाण केली. त्यामुळे मला राग आल्याने मी पांडूच्या आईला फरशीचा तुकडा फेकून मारला. त्यात ती जखमी झाली. त्यामुळे मला ते मारहाण करत आहे. असे अर्जुनने करणला सांगितले. त्यानंतर मी ड्युटीवर असल्याने घरी येता येणार नाही. तू भांडण करू नको घरी जा. असे करणने अर्जुनला सांगितले. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास करण घरी आला, तेव्हा अर्जुन घरी नव्हता. त्यामुळे त्याचा गावात शोध घेतला मात्र, तो मिळून आला नाही. शिवाय त्याचा फोन सुद्धा बंद होता.
सकाळी आढळला मृतदेह –
रात्री शोध घेतल्यानंतर झोपलेला करण सकाळी उठला असता त्याला अर्जुनचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत मिळून आल्याची माहिती मिळाली. त्याच्या अंगावर अंडरवेअर वगळता कोणतेही कपडे नव्हते. शिवाय मारहाण करण्यात आल्याचे वळ व जखमा अर्जुनच्या अंगावर स्पष्ट दिसत होत्या. शिवाय बांबूची काठी, लिंबाची ओली अर्धवट तुटलेली काठी, नारळाचा अर्धवट तुटलेला फंटा, कमरेच्या बेल्टचे तुटलेले तुकडे, इलेक्ट्रिक केबल वायर आजूबाजूला पडलेले होते. शिवाय गावातील काही प्रत्यक्षदर्शींनी पांडू प्रधान व त्याच्या साथीदारांनी अर्जुन याला मारहाण केल्याचेही सांगितले.
दरम्यान करणचा सावत्र भाऊ रामकिसन प्रदान याने या घटनेची माहिती वाळुज एमआयडीसी पोलिसांना दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अर्जुन प्रधान याचा मृतदेह घाटीत हलवण्यात आला.
पाच आरोपींना बेड्या, दोन फरार –
याप्रकरणी आरोपी पांडुरंग वामन प्रधान (वय 35 वर्षे) अंकुश दिलीप प्रधान (वय 34 वर्षे), अनिकेत संजय काकडे (वय 24 वर्षे), अजय अशोक प्रधान (वय 24 वर्षे), नंदकुमार दादासाहेब बो-हाडे (वय 26 वर्षे), विठ्ठल नामदेव प्रधान (वय 38 वर्षे), निलेश मच्छिंद्र प्रधान (वय 25 वर्षे) सर्व रा. आंबेलोहळ ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून दोन जण फरार आहे.
यांनी केली कारवाई –
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडेपाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे, पोलीस अंमलदार बाळासाहेब आंधळे, राजेभाऊ कोल्हे, धीरज काबलीये, योगेश शेळके, विक्रम वाघ, नितीन इनामे, वैभव गायकवाड, लखन घुशिंगे, समाधान पाटील, हनुमंत ठोके, संतोष बबनवत, गजानन सोनूने, संदीप तागड आदींच्या पथकाने केली
