February 5, 2026


वाळुज महानगर – रस्ते, वीज, ड्रेनेजलाईन, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सुविधापासून वंचित असलेल्या वडगाव को येथील गट नंबर 9 मधील उपोषणाच्या चौथ्या दिवशी रविवारी 13 डिसेंबर रोजी कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान उपोषणार्थी ज्योती कांबळे या महिलेची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी तपासणी करून उपचारार्थ घाटीत हलवण्याचा सल्ला दिला.

वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी गट क्रमांक 9 येथील नागरीकांना ग्रामपंचायतने कोणत्याही सुविधा दिल्या नाही. त्यामुळे येथील नागरिकांना सुमारे दहा ते बारा वर्षापासून मूलभूत नागरी सुविधासह पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा कोणीही दखल घेत नाही म्हणून गट नंबर 9 मधील ज्योती मारुती कांबळे यांनी गुरुवारी 11 डिसेंबर रोजी बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणाला गट नंबर मधील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. रविवारी उपोषणाचा चौथा दिवस मावळला मात्र कोणीही या उपोषणाची दखल घेतली नसल्याने येथील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपोषणार्थी ज्योती कांबळे या महिलेसह उपोषणस्थळी इतर अनेक महिला देखील पाठिंबा देण्यासाठी बसून निषेध करत आहेत.
प्रकृती खालावल्याने डॉक्टर कडून तपासणी –
दरम्यान उपोषणाची ज्योती कांबळे या महिलेची प्रकृती खालावल्याने डॉक्टर शंकर देशपांडे यांनी तपासणी करून त्यांना उपचारार्थ घाटीत दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याशिवाय उपोषण न सोडवण्यावर त्या ठाम राहिल्या विशेष म्हणजे दवाखान्यात सुद्धा जाण्यास त्यांनी नकार दिला.
        निधी नसल्याने तूर्तास काम करणे अशक्य –
दरम्यान ग्रामपंचायतने या भागात एक कोटी वीस लाख रुपयांचे कामे केली. मात्र आता सध्या ग्रामपंचायतकडे कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नाही. निधी उपलब्ध होताच पुढील कामे करण्यात येईल. असे लेखी आश्वासन ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आले. मात्र एक कोटी वीस लाखातून काय काम केले. आणि कोणते केले ते दाखवा. असा प्रतिप्रश्न करत उपोषणार्थींनी उपोषण सोडण्यास मनाई केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *