वाळूजमहानगर – वाळूज येथील आयसीम इंजिनियरिंग व एमबीए कॉलेजने यावर्षापासून सामाजिक दृष्टिकोनातून उद्योग करणाऱ्या उद्योजकांना विजयेंद्र काबरा स्मृती पुरस्कार देण्याचे जाहीर केले. यंदाचा हा पुरस्कार जालना येथील उद्योजक सिद्धांत तवरावाला यांना एका विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कौशल्य विकास अभियानाचे प्रवर्तक म्हणून स्वातंत्र्य सेनानी विजयेंद्र काबरा यांची ओळख आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही मान्यवर मंडळीनी एकत्र येवून आयसीम कॉलेजची स्थापना झाली व या कॉलेज मधून शिक्षण घेतलेल्या अनेकांनी आपले उद्योग सुरू केले. वर्तमान काळात विद्यार्थ्याना प्रेरणादायी ठरणाऱ्या आणि सामाजिक हेतू ठेऊन उद्योग उभारणाऱ्या नव-उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जालना येथील उद्योजक तवरावाला यांना पहिला पुरस्कार घोषीत झाला. “पीशूट” नावाच्या त्यांच्या उत्पादनास टी व्ही शो “शार्क टँक इंडियातून” अर्थसाह्य मिळालेले आहे. हे साधन गर्दी आणि अडचणीच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांना मुत्रविसर्जनासाठी वापरात येते तसेच वापरास खूप सोपे असलेले हे साधन अनेक देशात निर्यातही केले जाते. आयसीम कॉलेज मध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला उद्योजक सुनिल रायथत्ता, आयसीमचे अध्यक्ष डॉ. सुभाष झंवर, उपाध्यक्ष रमाकांत पुलकुंडवार, सचिव दिलीप सारडा, विश्वस्त डॉ. कल्पना झंवर, डायरेक्टर डॉ. सी. एस. पद्मावत, उपप्राचार्य हेमंत जाधव, श्वेता तवरावाला, आनंद हुंबे, डाॅ. दीपमाला बिरादार, प्रा. मंगल काळे, प्रा. सायली राठोड, प्रा. शिवराम जंजाळ, प्रा. विनोद शिखरे आदींची उपस्थिती होती.