March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.24) – सध्याचा जमाना हा मार्केटिंगचा आहे. जो विकू शकतो त्याच्याकडे आपल्याला जावे लागेल. उद्योग करताना येणारे प्रत्येक आव्हान स्वीकारा. त्यावर मात करा, एकत्र आलेल्या उद्योजकानी आपली संघटनात्मक वज्रमूठ मजबूत ठेवावी. मी तुमच्या पाठीशी आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केले.

बुद्धिस्ट इंडस्ट्रिज मॅन्युफॅक्चर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन (बिमाटा) चा पदग्रहण शपथविधी समारंभाचे आयोजन वाळूज येथील माशिआ हॉल येथे 20 जुलै रोजी करण्यात आले होते. या समारंभात प्रमुख पाहुणे पालकमंत्री संजय शिरसाट मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात एस सी, एस टी समाजासाठी लागू असलेल्या योजना व संधी विषयी मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या संघर्षाच्या कथा सांगितल्या की, कसे ते सामान्य कुटुंबापासून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोचले. त्यांनी उद्योजकांना मार्गदर्शन करत मेहनत आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवून आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्याची प्रेरणा दिली.

प्रथम कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री संजय शिरसाट, मावळते अध्यक्ष मिलिंद थोरात आणि संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष मुदगडकर (कांबळे) यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली. त्यानंतर एल. एल. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक बुद्धवंदना झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष मोरे यांनी केले. त्यांनी संघटने (बिमाटा) चा उद्देश आणि आगामी कार्यप्रणालीविषयी माहिती दिली. यानंतर मिलिंद थोरात यांनी विचार व्यक्त केले.

शपथविधी समारंभ –
या समारंभात उद्योजक दुष्यंत आठवले यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. यामध्ये शपथग्रहण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष म्हणून सुभाष मुदगडकर, उपाध्यक्ष सुभाष मोरे, अतिरिक्त उपाध्यक्ष उत्तमराव वाकडे, सचिव प्रमोद राऊत, सहसचिव विनोद अवसरमल, कोषाध्यक्ष रामचंद्र पठारे, जनसंपर्क अधिकारी रवी खैरनार, स्किल डेव्हलपमेंट संचालक सूरज दुमने, संचालक रविकुमार वसाटे, मिलिंद बागुल, बाळासाहेब पठारे, स्वीकृत संचालक संदीप साळवे, रामप्रसाद शिंदे, रवींद्र दिवेकर, संदीप पाटील, हर्षानंद तायडे, मिलिंद काशिदे आदींचा समावेश आहे.

अध्यक्षीय भाषण –
विद्यमान अध्यक्ष सुभाष भानुदास मुदगडकर यांनी बिमाटाच्या उद्देशाबद्दल सांगितले की, बिमाटाचा मुख्य उद्देश एससी, एसटी समाजातील उद्योजकांना सक्षम बनवणे आहे. जेणेकरून ते उद्योगक्षेत्रात यशस्वी होऊ शकतील. त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात एससी, एसटी उद्योजकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि कार्यक्षमतेने उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन दिले.

बिमाटाची प्रमुख मागणी:-
कार्यक्रमाच्या समारोपानंतर बिमाटाच्या वतीने मुख्य मागण्यांचे निवेदन पालकमंत्री संजय शिरसाट यांना दिले. यामध्ये एससी, एसटी समाजासाठी स्वतंत्र औद्योगिक क्लस्टर, सवलतीच्या कर्ज योजनांचा अधिक प्रवेश, एमआयडीसी प्लॉट वाटपामध्ये आरक्षण, आणि स्किल डेव्हलोपमेंट केंद्रांची आवश्यकता या मागण्यां चा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता मांजरमकर- गोरे यांनी केले. उद्योजक प्रमोद राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *