
वाळूज महानगर, ता.31 बातमीदार) – छत्रपती संभाजीनगर येथून उत्तर प्रदेश व बिहारकडे जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू करण्यात यावी. अशी मागणी एका निवेदनाद्वारे बजाजनगर येथील उत्तर भारतीयांच्या वतीने केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. 
या निवेदनात असे म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुमारे 7 ते 10 लाख उत्तर भारतीय कामगार, उद्योजक वर्षानुवर्षे त्यांच्या उपजीविकेसाठी स्थायिक झाले आहेत. उत्तर प्रदेश किंवा बिहारला जाण्यासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगरहून कोणत्याही रेल्वेची सुविधा नाही. दिक्षाभूमी एक्सप्रेस कोरोनाच्या काळात बंद आहे. उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरपासून 180 किमी अंतरावर असलेल्या मनमाड किंवा भुसावळला जावे लागते. परिणामी आर्थिक भुर्दंडासह अधिक वेळ लागतो. त्यामुळे संपर्क क्रांती (12753) ही ट्रेन आठवड्यातून एकदा धावते, ती दररोज सुरू करा. आणि दीक्षाभूमी एक्स्प्रेस कोरोनाच्या काळात बंद आहे, तीही छत्रपती संभाजीनगर मार्गे सुरू करण्यात यावी. याचा फायदा उत्तर भारतीयांना तर होईलच शिवाय पंतप्रधान तीर्थस्थान जोडो योजनेलाही लाभ होवून काशी विश्वनाथ, प्रयागराज, अयोध्या, गोरखधाम, गयाधाम येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना दर्शनाचा लाभ मिळणार आहे. म्हणून छत्रपती संभाजीनगर ते मनमाड, भुसावळ, इटारसी, झाशी, कानपूर, लखनौ, बनारस, गोरखपूर आणि पाटणा या विशेष ट्रेनची सुविधा उपलब्ध करून द्यावी. 
तसेच छत्रपती संभाजीनगर ते मनमाड, भुसावळ, इटारसी, झाशी, कानपूर, लखनौ, बनारस, शहागंज, आझमगढ मार्गे गोरखपूर आणि बनारस या मार्गाने पाटण्याला जाण्यासाठी गाड्यांची सोय करावी. तसेच जालना ते छपरा रेल्वे आणि जालना ते तिरुपती दररोज सुरु करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक नरेंद्रसिंह यादव, नागेश कुठारे, दीपक बडे, नंदकिशोर सिन्हा, राजेश सिंग, संतोष लोठे, योगेश साळे, राधेश्याम शर्मा, कैलास यादव, अरविंद सिंग, उपेन श्रीवास्तव, अमोघनाथ प्रजापती, बच्चा सिंग, जयप्रकाश सिंग, भूपेंद्र परिहार, धर्मेंद्र यादव, राजकुमार भारती, मनोज तिवारी, प्रजापती अर्जुन, सिंघ प्रजापती, राजकुमार भारती आदींनी केली आहे.
