वाळूज महानगर, (ता.13) – सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावरील साजापूर- करोडी चौफुली येथे उड्डाणपूल उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी सतत अपघात होत असतात. परिणामी आजपर्यंत येथे जवळजवळ 25 जणांचा बळी गेला असून 60 च्या वर जखमी होऊन त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. येथील अपघातास आळा बसावा म्हणून साजापूर करोडी ग्रामपंचायतच्या वतीने अनेक वेळा उड्डाणपूलची मागणी केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने साजापूर करोडीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी एकत्र येत रस्त्यावर उतरून साजापूर चौफुलीवर शुक्रवारी (ता.13) रोजी सकाळी तीव्र आंदोलन केले.
सोलापुर धुळे हायवे वाळूज परिसरातील साजापुर-करोडी ता.जि.छत्रपती संभाजीनगर येथून गेला आहे. हा महामार्ग करताना संबंधित विभागाने साजापुर-करोडी चौफुलीवर उड्डाणपूल करणे अत्यंत आवश्यक होते. मात्र तसे न केल्यामुळे या चौफुलीवर सतत अपघात होत आहे. परिणामी येथील अपघातामुळे कित्येक कुटूंब उध्वस्थ झालेले आहे. आतापर्यंत अंदाजे 20 ते 25 जणांनी आपले प्राण गमावले आहे. शिवाय 60 च्या वर जखमी होऊन त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे.
येथील अपघात टाळण्यासाठी या रस्त्याच्या चौफुलीवर उड्डाणपुल होणे खुप गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय करोडी व सजापूर यांनी संबंधित विभागाला वारंवार पत्र व्यवहार केला. मात्र याबाबत दखल घेतली नाही. त्यामुळे शुक्रवारी (ता.13) रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेस करोडी साजापुर चौफुलीवर करोडी, साजापूरसह पंचक्रोशीतील समस्थ ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सर्जेराव पाटील चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य विजय जाधव, करोडीच्या सरपंच गवांदे, उपसरपंच सोमीनाथ नवले, ग्रामपंचायत सदस्य मनीषा जाधव, सिंधुबाई गडगूळ, दगडू चव्हाण, योगेशरी जाधव, कैलास जाधव, देविदास गवांदे, युसुम शेख, किरण गंगावणे, अकुश राऊत, रोख राजू, जाफर पटेल, जबार पटेल, मुकतार शेख, हशीम शेय, लतीफ शेख, रामेश्वर बोटारे, सखाहारी सावने, राजु निकम आदींसह पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस अंमलदार अभिमन्यू सानप योगेश शेळके आदींनी चौक बंदोबस्त ठेवला.
या आंदोलनाबाबत अभियंता राहुल पाटील म्हणाले की, करोडी- साजापूर चौक येथील उड्डाणपूलाच्या मागणी संदर्भात वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. त्यांच्याकडून अहवाल येताच पुढील कार्यवाही करण्यात येईल. मात्र तोपर्यंत अपघात टाळण्यासाठीच्या इतर उपाय योजना करण्यात येईल. असे आश्वासन दिले.