
वाळूजमहानगर, (ता.15) – ढाप्या अभावी उघड्या पडलेल्या नालीत गाय पडली. ती रात्रभर नालीतच हंबरत राहिली. दुसऱ्या दिवशी तिच्या हंबरण्याचा आवाज आल्याने एका दक्ष नागरिकांनी ही माहिती अग्निशमन दलास कळवली. आणि या गाईचे प्राण वाचले. माता म्हणून मान्यता असलेल्या गाईच्या जीवावर बेतलेला हा प्रकार बेतल्याने नागरिकांमधून एमआयडीसीच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

ढाप्या अभावी उघड्या पडलेल्या नाल्या, शेजारीच साचलेला केरकचरा व तेथे एकत्र आलेले मोकाट जनावरे. हे चित्र वाळूज परिसरातील बजाजनगर या कामगार वसाहतीतील विविध ठिकाणी दररोज पहावयास मिळते. आयोध्यानगर परिसरातील उघड्या नालीमध्ये रविवारी रात्री एक गाय पडली. तिला वर येता न आल्याने ती रात्रभर नालीतच होती. सोमवारी ती हंबरत असल्याचे एका नागरिकाच्या लक्षात आले. त्याने ही माहिती माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील यांना दिली. गोमाता नालीत पडल्याचे समजताच सतीश पाटील यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यामुळे तत्काळ घटनास्थळी अग्निशमन जवान हजर झाले व त्यांनी सुरक्षित बाहेर काढल्याने या गोमातेचा जीव वाचला.
दुर्लक्ष की, गलथान कारभार –
येथील कचऱ्याबाबत अनेक तक्रारी येत असतात. मात्र कचरा उचलण्याचे कंत्राट एमआयडीसीने महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीला दिले आहे. त्यामुळे एमआयडीसी थेट हात वर करते. या परिसरात कचऱ्याच्या समस्या बरोबरच मोकाट जनावरे, उंच व वाकडी तिकडे वाढलेली दुभाजकावरील शोभेची झाडे, सर्विस रोड रखडल्याने होणारी वाहतुकीची कोंडी, नाल्या स्वच्छ न केल्याने डासाचे वाढते प्रमाण, ढाप्या अभावी उघड्या पडलेल्या नाल्या. अशा अनेक समस्या आहेत. मात्र याकडे नेहमी डोळे झाक होताना दिसते. या प्रकाराला दुर्लक्ष म्हणावे की, एमआयडीसी प्रशासनाच्या गलथान कारभार. प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
