
वाळुज महानगर, (ता.14) – उघड्या दरवाजातून प्रवेश करून घरातील एकदंत नवरात्र उत्सव मंडळाची काचेची दानपेटी अज्ञात आरोपीने चोरून नेली. ही घटना शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास साईनगर, सिडको वाळूज महानगर 1 येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पियुष सत्यनारायण पवार (वय 22 वर्षे) हा घरात झोपलेला असताना त्याची आई अंगण झाडत होती. दरम्यानची दरवाजा ढकलून आत गेली असता एका अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून घरात ठेवलेली एकदंत नवरात्र उत्सव मंडळाची काचेची दानपेटी चोरून नेली. या दानपेटी मध्ये 500, 100 व 50 रुपये दराच्या नोटा मिळून असे एकूण 8 हजार रुपये होते.
पाठलाग करताना मोबाईल पडला –
घरातील दानपेटी कुणीतरी घेऊन जात आहे. हे पाहताच आईने आरडाओरड केल्याने पियुष पवार हा झोपेतून उठला. चोरट्याचा पाठलाग करताना त्याने चोरून आणलेला मोबाईल दरवाज्यात पडला. मात्र मोबाईल उचलण्याच्या प्रयत्नात आपण पकडल्या जाऊ नये. म्हणून मोबाईल न उचलताच चोर पळून गेला. दरम्यान हा मोबाईल देवगिरीनगर, सिडको येथील स्वाती अरुण कोऱ्हाळे या महिलेच्या घरातून चोरी केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी वाळूचे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
