
वाळूजमहानगर, ता.14 – बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीतील एक्स- 147 दिशा कॉम्प्लेक्स मधील सिल्वर इन हॉटेल, बियर बार, परमिट रूम या दारू दुकानास नागरिकांचा विरोध झुगारून शासकीय अधिकाऱ्यांनी एकतर्फी परवानगी दिली. त्यामुळे इंद्रप्रस्थ कॉलनीतील नागरिक येणाऱ्या विधान सभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहत.
याबाबत बुधवारी (ता.13) रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बजाजनगर या कामगार वसाहतीतील इंद्रप्रस्थ कॉलनी येथे होणारे बिअर बार परमिट रूम या दारूच्या दुकानाला परवानगी देण्यात येऊ नये. म्हणून येथील नागरिक 2018 पासून वारंवार संबंधित विभागीय अधिकारी यांना तोंडी, लेखी त्याचप्रमाणे आमरण उपोषण करून कळविले होते. मात्र तरीसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी शासनमान्य पहिली ते बारावीपर्यंत असलेली शिवछत्रपती विद्यालय, अल्फोंसा हायस्कूल व इंद्रप्रस्थ कॉलनीतील रहिवासी नागरिकांचा असलेला विरोध यांचा कसल्याच प्रकारे विचार न घेता एकतर्फी सिल्वर इन हॉटेलला परवानगी दिली. त्याचप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांनी सत्य परिस्थिती न मांडता खोटी माहिती व आपल्या मर्जीप्रमाणे अहवाल तयार करतात व शासन चालवतात व सर्वसामान्य नागरिकांवर दडपण आणतात. असे जर या लोकशाही राज्यात घटनाबाह्य शासकीय अधिकारी व पुढारी काम करत असतील तर नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? असा प्रश्न उपस्थित करत इंद्रप्रस्थ कॉलनीतील रहिवासी नागरिक मतदानावर बहिष्कार टाकत आहोत. इंद्रप्रस्थ सेवाभावी संस्थेच्या लेटर पॅडवर नागरिकांनी दिलेल्या
या निवेदनावर जगन्नाथ कोळी, नागेश शिंदे, संदीप बहादुरे, अमोल राजुळे, नामदेव बुलबुले, नामदेव शेळके, विजय गाडे, निलेश कोटलवार, माया घोरपडे, यमुना बुलबुले, सुवर्णा कोळी, अलका गाडे, माया बहादुरे, शीला शिंदे आदींची नावे व स्वाक्षऱ्या आहेत.
