
वाळूजमहानगर, (ता.6) – वाळूज येथील इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (आयसीम) या कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन 10 ते 11 मार्च रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ 10 मार्च सायंकाळी 6 वाजता होणार असून नाट्य व मालिका अभिनेत्री ऐश्वर्या कुलकर्णी हिची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आयसीम इंजिनियरिंग व एमबीए कॉलेज दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करते. यंदा डान्स कॉम्पिटिशन, गायन स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा यांचे आयोजन केले आहे. यामध्ये व्यक्तिगत आणि सामूहिक सहभाग घेता येईल. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा निकाल 11 मार्च रोजी जाहीर केला जाईल. त्याच दिवशी पारितोषिक देण्यात येतील. सांस्कृतिक कार्यक्रमाने उपक्रमाचा शेवट होईल. पारितोषक विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, करंडक, आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात येईल.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची अंतिम तारीख 7 मार्च आहे. ज्यांना ऑफलाईन नोंदणी करायची आहे. ते प्रत्यक्ष कॉलेजमध्ये येऊन नोंदणी करू शकतात.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील महाविद्यालयांना सहभागी करून घेत 10 आणि 11 मार्च रोजी आयोजन करण्यात आलेल्या अंतरमहाविद्यालयीन विविध स्पर्धेत कोणत्याही पदविका व पदवीला शिकत असलेले विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. यासाठी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन संचालक डाॅ. आर. एस. जहागिरदार यांनी केले. यावेळी उपप्राचार्य हेमंत जाधव, डाॅ. दिपमाला बिरादार, प्रा. आनंद हुंबे, प्रा. मंगल काळे, अच्युत भोसले यांची उपस्थिती होती.
