
वाळूजमहानगर, (ता.27) – बुद्ध वंदनेसह ध्यानसाधना व इतर धार्मिक कार्यक्रमासाठी असलेल्या बजाजनगर येथील आम्रपाली बुद्ध विहाराला हातगाडी, टपऱ्या व विविध दुकानाच्या अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळाची जागा हडप होण्याची शक्यता आहे. शिवाय घाणीच्या साम्राज्यामुळे विटंबनेसह ध्यानसाधना भंग होऊन पावित्र्यही धोक्यात येण्याची शक्यता असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

आम्रपाली बुध्द विहार, प्लॉट क्र.ओ-29, वडगांव (को.) बजाजनगर एमआयडीसी, वाळूज या बुध्दविहाराच्या प्रांगणात काही दुकानधारकांनी अतिक्रमण दुकाने थाटली आहेत. जणू काही हे बुद्ध विहार अतिक्रमणात हरवले आहे. काही दिवसापूर्वी शांत असलेला हा परिसर आज अत्यंत गोगाटात सापडला आहे. अतिक्रमण धारकांच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या आवाजाने व गाड्यांच्या आवाजाने बुध्द वंदनेस व ध्यान साधनेस बसलेल्या उपासकांना त्रास होवून ध्यानसाधना भंग होते. बुध्द विहाराच्या प्रागंणात बिर्याणी शॉप असल्याने तेथेच अनेक लोक दारु पितात, त्याच ठिकाणी बिर्याणी खातात, लघुशंका करतात. दारुच्या बाटल्या, ग्लास परिसरात टाकल्या जात असल्याने सगळीकडे अस्वच्छता पसरली आहे. तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे खच पडले आहेत. या सर्व घाणीमुळे बुध्दविहाराची विटंबना होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.
बुद्ध विहाराच्या प्रागंणातील सर्वच अतिक्रमणे निष्कासित करुन अतिक्रमण धारकावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ही होत आहे. या बाबतचे निवेदन मुख्य अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच पोलिस आयुक्त यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी दिले आहे. यावेळी अविनाश गायकवाड, पवन पवार उपस्थित होते.

या अतिक्रमणाबाबत बोलताना आम्रपाली बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष रामदास बर्फे म्हणाले की, आम्ही कोणाकडूनही वर्गणी जमा करत नाही. वर्गणी मागितली तर काही लोकं खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात. हे अतिक्रमण नसून दुकाने आहेत. या दुकानांमुळे येणाऱ्या पैशातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह विविध धार्मिक कार्यक्रम तसेच दिवाबत्ती चालते.
