
वाळूजमहानगर (ता.30) – घाणेगाव येथील खंदारे कुटुंबाच्या घराला अचानक आग लागून संपूर्ण घर उध्वस्त झाले. त्यामुळे उघड्यावर पडलेल्या या कुटुंबाला वाळूज औद्योगिक वसाहतीतील समाजसेवकांनी पुढे येत ब्लॅंकेट, मुलांना ड्रेस, साड्या व मिठाई देऊन थीर दिला. 
वाळूज औद्योगिक वसाहतीमधील निरंजन नामदेव खंदारे हे घाणेगाव येथील एकलव्यनगरात पत्नी व मुलासह पत्र्याच्या घरात राहतात. शनिवारी (ता.29) ऑक्टोंबर सकाळी 11 वाजेच्या सुमारास निरंजन नामदेव खंदारे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा अचानक स्पोर्ट होऊन घराला आग लागली. या घटनेमध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नाही. परंतु खंदारे यांच्या घरामधील रोख 20 हजार रुपयांसह सोन्याचांदीचे दागिने तसेच संसारोपयोगी साहित्य या आगीत जळून खाक झाले. त्यामुळे खंदारे कुटुंब उघड्यावर पडले होत. त्यातच थंडीचे दिवस. त्यामुळे या घटनेनंतर या पीडित कुटुंबास तात्काळ मदतीचा हातभार म्हणून सामाजिक कार्यकर्ते मनोज जैन, अमित व्यवहारे व वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज या कंपनीचे सहाय्यक महाव्यवस्थापक व्यंकट मैलापुरे हे तात्काळ मदतीसाठी धावून आले व निरंजन नामदेव खंदारे यांच्या कुटुंबासाठी लागणारे कपडे, ब्लॅंकेट, साड्या, मुलीसाठी व मुलासाठी ड्रेस व घरात तात्काळ लागणारे साहित्य व मिठाई देऊन निरंजन खंदारे कुटुंबीयास दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
