वाळूजमहानगर (ता.24) – बिअर शॉपी, मोबाईल शॉपी, मेडिकल, कृषी सेवा केंद्र अशा पाच दुकानाचे शटर एकाच रात्री उचकटुन रोख रक्कमेसह जवळजवळ 28 हजार रुपयाचा ऐवज लंपास केला. ही चोरीची घटना आंबेलोहळ येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे येथे कालच ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,
सागर दिलीपराव बनकर (रा.गारखेडा परिसर) यांचे आंबेलोहळ येथे वैभव बिअर शॉपी या नावाचे बिअर विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी (ता.24) रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास आंबेलोहळ येथील अशेक बनकर यांनी सागर बनकरला संपर्क करुन तुमच्या बिअर शॅपीचे दुकान तसेच गावातील आणखी चार दुकाने चोरट्यांनी फोडल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच सागर बनकर हे गावात पोहचले असता त्यांना दुकानातुन 15 हजार 725 रुपये किमंतीच्या 85 बिअरच्या बाटल्या चोरी गेल्याचे दिसले. तसेच गावातील देवीदास बालचंद उगले यांचे माऊली कृषी सेवा केंद्राच्या दुकानाचे शटर उचकटुन आतील 5 हजाराचा मोबाईल चोरट्यांनी नेला. यानंतर गावातील गणेश पुंजाराम बोराडे यांचे गुरु माऊली मेडीकल स्टोअर्सचे शटर उचकटुन आतमधील 3 हजार 500 रुपये किमंतीचे कॉस्मॅटीक साहित्य, मनोहर बाबासाहेब प्रधान यांच्या जयदुर्गा कृषी सेवा केंद्राचे शटर उचकटुन रोख 700 रुपये व सलमान ईस्माईल खान यांच्या मोबाईल शॉपीचे शटर उचकटुन चोरट्यांनी रोख 2 हजार तसेच 1 हजार रुपये किमंतीचे चार्जर व एअर फोन लांबविले. अज्ञात चोरट्यांनी गावातील 5 दुकानाचे शटर उचकटुन रोख रक्कमेसह 27 हजार 925 रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी सागर दिलीप बनकरच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अशोक इंगोले करीत आहेत.
आठवड्यातील दुसरी घटना –
आंबेलोहळ येथे गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे दुकानाचे शटर उचकटून व मंदिरातील दानपेटीसह रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चरोट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्राम संरक्षक दलाची स्थापना –
त्यामुळे येथील चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबेलोहळ येथे ग्राम संरक्षण दलाची स्थापना करण्यात आली. मात्र तरीही एकाच रात्री पाच दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी एक प्रकारे ग्राम संरक्षण दल व वाळुज एमआयडीसी पोलिसांना आव्हान दिले आहे.