
वाळूज महानगर, ता.7) – वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रालीसह ट्रक्टर उलटले, त्यामुळे ट्रॅक्टरखाली दबून चालक जागीच ठार झाला. मात्र प्रसंगावधान राखत ट्रक्टर मधील तीन मजुरांनी उड्या मारल्याने ते बालंबाल बचावले. हा अपघात गुरूवारी (ता.7) सकाळी 9 वाजेच्या सुमारास अंबेलोहळ ते वडगाव रस्त्यावरील नागझरी नदीत झाला. 
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंबेलोहळ येथील जिया सेठ याच्या विना क्रमांकाच्या ट्रक्टरवर भारत नाथाजी दाभाडे (22) रा.अंबेलोहळ हा चालक म्हणून काम करत होता. गुरूवारी (ता.7) रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास भारत हा ट्रक्टर मध्ये वाळू भरून नागझरी नदीतून अंबेलोहकडे येत होता. यावेळी ट्रक्टर मध्ये चालकासह किरण संजय दाभाडे, अर्जुन प्रधान व अन्य एक असे तीन मजुर होते. भरधाव असलेल्या या ट्रक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक्टर ट्रालीसह नागझरी नदीतील बंधार्याजवळ उलटले. या अपघातात चालक भारत दाभाडे हा ट्रक्टरखाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 
मात्र सुदैवाने ट्रक्टरमधील तीन मजुंरानी उडी मारल्याने ते बालंबाल बचावले. अपघाची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे विनोद नितनवरे, पंकज साळवे, तुकाराम पवार, विजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत भारत दाभाडे यास संजय दाभाडे व गौतम जाधव यांच्या मदतीने घाटीत दाखल केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे़.
