वाळूजमहानगर, ता.3 (बातमीदार) – शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी जीविकास हानिकारक असलेला सुगंधित गुटखा पान मसाल्याची अवैधरित्या वाहतूक करणारे त्रिकूट पोलिसांच्या जाळ्यात अडकले. आरोपींच्या ताब्यातून 94 लाख 15 हजार 792 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (ता.3) रोजी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीतील कासबर्ग कंपनी मागे धुळे सोलापूर रोडजवळ करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाने विक्री व खाण्यापिण्याकरिता प्रतिबंधित केलेल्या तंबाखू जन्य पदार्थ विक्रीसाठी वाहतूक करीत असलेला आयशर टेम्पो वाळुज औद्योगिक वसाहतीतील काचबर्ग कंपनी मार्गे सहजापूरकडे जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी (ता.3) रोजी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास सापळा रचला. या सापळ्यात आरोपी मोहम्मद शरीफ मोहम्मद सादिक (वय 46) रा. शकीर किराणा दुकानाजवळ नागपूर गेट ता. जि.अमरावती, ताहेरखान रशीदखान (वय 37) रा.बडनेरा आठवडी बाजार अमरावती, अनिस शरीफ शेख (वय 35) रा. रहेमानिया कॉलनी किराडपुरा ता. जि.छत्रपती संभाजीनगर हे मिळून आले.
यावेळी पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 60 लाख 660 रुपये किमतीच्या बाजीराव फेम पान मसाल्याच्या 74 मोठ्या पांढऱ्या प्लास्टिकच्या गोण्या, 12 लाख 132 रुपये किमतीच्या मस्तानी – 216 सेविंग प्रीमियम तंबाखूच्या 74 मोठ्या पांढऱ्या प्लास्टिकच्या गोण्या, 18 लाख रुपये किमतीचा आयशर कंपनीचा टेम्पो (एम एच13, डीक्यू-8124), 4 लाख रुपये किंमतची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार (एम एच 27, ए आर -7356), 5 हजार रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल, 5 हजार रुपये किमतीचा ओप्पो मोबाईल, 5 हजार रुपये किमतीचा विवो मोबाईल. असा एकूण 94 लाख 15 हजार 792 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विशाल साहेबराव पाटील (वय 38) यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे करीत आहे.