वाळूजमहानगर, ता.5 – नातेवाईकांच्या लग्नात ओळख झाल्याने अल्पवयीन मुलीचे 21 वर्षीय तरुणासोबत सुत जुळले. त्यामुळे दोघांमध्ये शारीरिक संबंध आले. त्यातून ती गर्भवती असल्याचे उघडकीस आल्याने वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार गेल्या नोव्हेंबर महिन्यात वाळूज परिसरात घडला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील 17 वर्षीय मुलगी कुटुंबासह दहा ते पंधरा वर्षापासून वाळुज परिसरात राहते. ती 12 वी वर्गात शिकते. मोठा रक्तस्त्राव होऊन पोटात दुखत असल्याने तीला उपचारार्थ कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांनी तपासले असता ती गरोदर असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी दवाखान्यातून आलेल्या माहितीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पीडित मुलीचा जवाब नोंदवला की, ती नातेवाईकांच्या लग्नासाठी गावाकडे गेली असता तिची मनोज किशनराव पाटील (वय 21) रा. शेदुरजा ता.मनोरो जि. वाशिम याच्याशी मैत्री झाली. त्याने तिला फोनवर प्रपोज केल्याने दोघांचे सुत जुळले. तेव्हापासून ते फोनवर एकमेकांशी बोलत होते. नोव्हेंबर 2024 मध्ये मनोज हा तीला भेटण्यासाठी वाळूज परिसरात आला. व मित्राच्या फ्लॅटवर तिला घेऊन गेला. तेथे दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. त्यानंतर तिची मासिक पाळी बंद होऊन 31 डिसेंबर 2024 रोजी मोठा रक्तस्राव झाला. त्यामुळे तिला 2 जानेवारी 2025 रोजी उपचारार्थ कमलनयन बजाज हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासले असता ती गरोदर असल्याचे उघडकीस झाल्याने डॉक्टरांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी चौकशी केली असता तिने हा प्रकार माझ्या संमतीने झाला असल्याचे सांगून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास नकार दिला. या प्रकरणी वाळुज एमआयडीसी ठाण्याचे उपनिरीक्षक रावसाहेब काकड यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन तक्रार दिल्याने आरोपी मनोज पाटील याच्या विरुध्द कलम 64 (1) भारतीय न्याय संहिता 2023 सह कलम 4, 5 (जे ) (2) आर/डब्लू 6 बालकाचे लैगिंक अपराधा पासून संरक्षण 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे