March 22, 2026


वाळुज महानगर – पंढरपूर ते छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील अब्बास पेट्रोल पंपासमोर अमोल एकनाथ बारे या 31 वर्षीय तरुणाचा फारकत मागण्याच्या कारणावरून चाकूने भोसकून खून केला. रविवारी 4 जानेवारी रोजी रात्री झालेल्या या घटनेनंतर फरार झालेल्या चार आरोपींच्या वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी 7 जानेवारी रोजी जालना येथून मुस्क्या आवळल्या. आरोपीमध्ये एका विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे.

वाळुज जवळील नायगाव बकवालनगर येथील अमोल एकनाथ  बारे याचा पत्नी बरोबर वाद असल्याने तो तिच्यापासून फारकत मागत होता. त्यामुळे झालेल्या वादातून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अब्बास पेट्रोल पंपासमोर अमोल एकनाथ बारे या 31 वर्षीय तरुणाचा 4 अज्ञात आरोपींनी रविवारी 4 जानेवारी रोजी रात्री 10:40 वाजेच्या सुमारास चाकूने सपासप वार करून खून केला होता. या प्रकरणाचा पुढील तपास करताना वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथक तयार करून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना आणि नाशिक या जिल्ह्यात आरोपींच्या शोधार्थ रवाना केले. या पथकाने गोपनीय माहिती काढून एका विधी संघर्ष बालकास दौंड साखर कारखाना येथुन मंगळवारी 6 जानेवारी रोजी ताब्यात घेतले.

असता आरोपी हे नाशिक गेल्याचे समजले. त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर गेले. मात्र आरोपीतांनी नविन सिमकार्ड घेवुन त्यांचे वेळोवेळी लोकेशन बदलवुन ते कायम पोलीसांना गुंगारा देत होते. मात्र त्यांचे पैसे संपल्याने ते जालना येथील एका केटर्सकडे पैसे मागण्यासाठी जाणार असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. परंतु पोलीसांची दोन्ही पथके ही नाशिक जिल्ह्यात असल्याने तसेच आरोपी पैसे घेवुन परराज्यात पसार होण्याची दाट शक्यता असल्याने त्यांनी वरिष्ठांना कळवुन जालना पोलीसांची मदत मागीतली व जालना पोलीसांना आरोपीचा मोबाईल क्रमांक व फोटो पुरविले.

दरम्यान आरोपी हे बुधवारी 7 जानेवारी रोजी 11 वाजेच्या सुमारास जालना बसस्थानकावर आले. व त्यांनी पैश्यासाठी केटर्सला फोन करताच जालना पोलीसांनी युवराज कैलास राठोड, प्रमोद भाऊसाहेब वाघचोरे व शुभम पंडित राठोड या 3 आरोपीतांना ताब्यात घेवुन वाळुज एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.

              असे आहेत आरोपी –
युवराज कैलास राठोड (वय 20 वर्षे), रा. गल्ली नं. 2 हनुमाननगर, प्रमोद भाऊसाहेब वाघचोरे (वय 27 वर्षे), शुभम पंडित राठोड (वय 25 वर्षे) दोन्ही रा. मुकुंदवाडी व एक विधीसंघर्ष बालक अशी आरोपींची नावे व पत्ते आहेत.

               फोटोमुळे आरोपींचा सापडला माग –
पंढरपूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अब्बास पेट्रोल पंपासमोर अमोल बारे याला आरोपी हे मारहाण करीत असताना पोलीस तेथे पोहोचले. त्यामुळे आरोपी पळून जात असताना पोलिसांनी एका आरोपीचा फोटो काढला. याच फोटोवरून वाळुज एमआयडीसी ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन खुन करणारे आरोपी हे हनुमानगर व मुकुंदवाडी भागातील असल्याचे निष्पन्न करुन आरोपीचा माग काढला.

             अठरासे किलोमीटर पाठलाग –
अमोल बारे याचा चाकूने भोसकून खून केल्यानंतर आरोपी हे फरार झाले. त्यांच्या मागावर असलेल्या वाळूज एमआयडीसी पोलिसांनी फरार झालेल्या चार आरोपींपैकी एका विधी संघर्ष बालकाला दौंड येथून ताब्यात घेतले. तर नवीन सिम कार्ड घेऊन सतत लोकेशन बदलत असलेल्या अन्य तीन आरोपीना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक व जालना असा 1 हजार 800 किलोमीटर पाठलाग करत जालन्यातून ताब्यात घेतले.

             पैसे संपल्याने अडकले जाळ्यात –
दरम्यान फरार झालेल्या आरोपी हे सतत लोकेशन बदलत फिरत होते. त्यामुळे त्यांच्याजवळचे पैसे संपले. म्हणून आरोपी हे जालन्या येथे एका कॅटर्सकडे पैसे मागायला गेले असताना बस स्थानकावरच पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

               यांनी केली कामगिरी –
ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त भागिरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोउपनि. सागर पाटील, प्रविण पाथरकर, पोलीस हवालदार अरुण उगले, सय्यद चांद, पोलीस अंमलदार नितीन ईनामे, समाधान पाटील, हनुमान ठोके, वैभव गायकवाड, सुरेश भिसे, संदीप तागड, दिपक जाधव, राजु वाघ, रोहीत चिंधाळे, शिवनारायण नागेरे यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *