वाळूजमहानगर, (ता.28) – पैसा कमावण्यासाठी कोणी काहीही करू शकतो, कोणत्याही थराला जाऊ शकतो. असे हेच दाखवून दाखवून देणारे चित्र शनिवारी (ता.28) रोजी वाळूज एमआयडीसी परिसरात पहावयास मिळाले. त्याचे असे झाले की,
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विना परवाना व बेकायदेशीररित्या एका गोडाऊन मध्ये आला असल्याची माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी पोलीसांनी छापा टाकून टाटा टेंपोसह 24 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (ता.28) रोजीचे पहाटे 1 वाजता करण्यात आली.

याबाबत वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगल यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा व सुगंधीत तंबाखु टाटा टॅम्पो (डीडी 01-सी -9551) यामधे घेऊन साजापूर येथे आलेला आहे. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने राजस्थान धाब्याजवळ, धुळे-सोलापूर हायवे, साजापूर, ता. जि. औरंगाबाद येथे उभी असलेला टाटा टॅम्पोवर छापा मारला व टॅम्पोची पाहणी करता त्यात गोवा गुटखा व सुगंधीत तंबाखु असा मुद्देमाल मिळून आला. याबाबत अन्न औषधी निरीक्षक यांच्या मदतीने मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 13 लाख 77 हजार रुपयांचा गोवा गुटखा व सुगंधीत तंबाखु व 11 लाख रुपये किमतीचा टाटा टेम्पोचा समावेश आहे. तसेच हा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणारा दत्ता आनंदराव मंडाळ, वय 27, रा. मानेपूरी, ता. घनसावंगी, जि. जालना. (ह. मु. नरोली, ता. जि. सिल्वासा) यास ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अन्न-औषध निरीक्षक सुलक्षणा त्रिंबकराव जाधवर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगीरी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उपआयुक्त दिपक गिर्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे तसेच विशेष तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक चेतन आगले, पोलीस नाईक विनोद नितनवरे, पंकज साळवे, पोलीस अंमलदार सुरेश कचे,
यशवंत गोबाडे, सुरजकुमार अग्रवाल यांनी केली.
