-
वाळूज महानगर, (ता.31) – मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या आंदोलनामुळे औद्योगिक क्षेत्रात अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही समाजकंटक तसेच आपसातील वादामुळे या आंदोलनाच्या नावाखाली औद्योगिक क्षेत्रात विघातक कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. असे मार्गदर्शनपर आवाहन पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी रविवारी (ता.31) रोजी केले.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभुमीवर राज्यात ठीकठिकाणी उपोषणे, रस्ता रोको करण्यात येत आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक अप्रिय घटना घडत आहे. त्यामुळे वाळूज औद्योगिक वसाहतीतही अनुचित प्रकार घडू शकतो. अशा अप्रिय घडना टाळण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.31) रोजी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी मार्गदर्शन करत सुरक्षितेच्या दृष्टीने दर्शनी भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, अतिरिक्त सुरक्षारक्षकांची नेमणुक करणे, कामगाराची ने-आण करणार्या बस व वाहनांना संरक्षक जाळी लावणे, कारखान्यातील अग्नीशमन यंत्रणा कार्यान्वित करणे, संशयित इसमाची माहिती पोलिसांना देणे, कारखाना परिसरात पुरेसे पथदिवे लावणे. आदी विषयी सुचना देण्यात आल्या.
यावेळी सकल मराठा समाजाचे नितीन देशमुख, माजी सरपंच सचिन गरड, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, रांजणगावचे सरपंच प्रभाकर महालकर, घाणेगावचे सरपंच केशव गायके, उद्योजक हनुमान भोंडवे, तिसगावचे नागेश कुठारे, विष्णु जाधव, राम जानकी प्रतिष्ठानचे आर.के.सिंह, इंडुरन्सचे गणेश औटी यांनीही आपापले मते व्यक्त करून शांतता राखण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस वाळूज औद्योगिक वसाहतीतील इपका लॅबोरेटरीचे व्यंकट मैलापुरे, व्हेरॉक कंपनीचे राहुल टेकाळे, साजापूरचे सरपंच जनार्धन बन्सोडे, बजाजनगरचे ग्रामपंचायत सदस्य विजय सरकटे, गोरखनाथ पवार, मोहनीराज धनवटे, बप्पा दळवी, बाबासाहेब घुले, नरेंद्र यादव, जी.डी.कोळकेर आदींची उपस्थिती होती.