
वाळुज महानगर (ता.3) :- अण्णांनी कारखाना चांगला चालवला, आता त्यांचे पुत्र असतील परंतु ते चांगले असायला पाहिजे ना, राजकारणी पुत्र चांगला असावा, ज्यांनी गंगापूर साखर कारखान्याच्या साम्राज्याची, वैभवाची ज्यांनी माती केली, चालू कारखाना बंद पाडण्यासाठी सहयोग दिला. आम्ही अण्णांच्या चांगल्या गोष्टी पुनर्जीवित करू, अण्णा सारखाच किंवा त्याहीपेक्षा चांगला कारखाना चालून दाखवू. असे आश्वासन आमदार प्रशांत बंब यांनी लिंबे जळगाव येथे शुक्रवारी (ता.3) रोजी केले.
वाळुज गटातील ऊस उत्पादक, शेतकरी, सभासदांचा मेळावा तुर्काबाद – लिंबेजळगाव येथील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता.3) रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार बंब बोलत होते. ते म्हणाले की, निवडणुका येतात जातात. नेते येतात जातात त्याच्याने काही फरक पडत नाही. परंतु आता ही निवडणूक सहकार्याची निवडणूक आहे. माझ्यासह माझे संचालक मंडळ, मित्र हे केवळ निमित्त मात्र आहेत. खऱ्या अर्थाने ही निवडणूक सत्तेच्या विरोधात असत्याची आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांनी आपापल्या गावात जाऊन एकत्र येऊन चर्चा करावी. आम्ही जे बोलत आहोत, साखर कारखाना वाचवण्यासाठी व तो सुरू करण्यासाठी जे प्रयत्न करत आहोत ते खरे आहे की खोटे. हे तपासा मगच मतदान करा. यावेळी गंगापूर साखर कारखान्यावर सभासद शेतकऱ्यांची पकड मजबूत करण्यासाठी साद घालत पुढील हंगामात साखर कारखाण्यासह डिशलरी, इथेनॉल अद्यावत मशनरीसह सुरू करणार असेही आमदार बंब म्हणाले. यावेळी व्यासपीठावर किशोर धणायत, शिवनाथ मालकर, नंदकुमार गांधीले, कारभारी रावते, माजी सभापती जोती गायकवाड, माजी जिल्हापरिषद सदस्या पुष्पा जाधव,
सावळीराम थोरात, रामवेश्वर मालुसरे यांच्यासह उमेदवार संचालक मंडळ, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
