
वाळूजमहानगर, (ता.5) – वाळुज औद्योगिक वसाहतीतील कंपनीतुन अडीच लाखाचे कॉपर वायर लांबविणा-या 5 चोरट्यांना एमआयडीसी वाळूज पोलीसांनी जेरबंद केले. आरोपीच्या ताब्यातुन चोरी झालेली कॉपर जप्त करण्यात आली.
गुजरातच्या वडोदरा येथील माधव इन्फ्रा प्रोजेक्ट लि. या कंपनीची वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाज कंपनीजवळ एक शाखा असून या ठिकाणी सोलार प्लॅन्ट उभारण्यात आलेला आहे. या सोलार प्लॅन्टसाठी लागणारे कॉपर वायरचे बंडल कंपनीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, 17 एप्रिल रोजी या कंपनीचे निरज तिवारी हे कंपनीत मिटरची रेडींग घेण्यासाठी गेले असता त्यांना कंपनीत ठेवलेले कॉपरचे बंडल गायब असल्याचे दिसून आले. हा चोरीचा प्रकार लक्षात येताच तिवारी यांनी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राजेंद्र गुप्ता यांच्याशी संपर्क करुन चोरीची माहिती दिली. ही माहिती मिळताच गुप्ता यांनी कंपनीत येऊन पाहणी केली असता त्यांना 2 लाख 47 हजार 403 रुपये किमंतीचे कॉपर वायरचे बंडल चोरीला गेल्याचे दिसले. यानंतर गुप्ता यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुद्देमालासह पाच चोरटे जेरबंद –
गुन्हा दाखल होताच एमआयडीसी वाळूज पोलीसांना परिसरात चोरट्याचा शोध सुरु केला. दरम्यान गुप्त बातमीदाराने सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांना वाळूजला काही इसमानी एका जीपमध्ये कॉपर वायरचे बंडल आणुन ते जाळून कॉपर वेगळी करुन शेरु नावाच्या इसमाकडे लपवून ठेवल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस पथकाने वाळूज व बकवालनगरात छापा मारुन 5 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे असलम बाबु पठाण, शेख दाऊद हानिफ, शेख सलीम बशीर, शेख शाहिर गणी व सय्यद जुनैद इनायत असल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्याुन चोरीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, पोहेकॉ.विनोद नितनवरे, पोकॉ.यशवंत गोबाडे, हनुमान ठोके, सुरेश भिसे, नितीन इनामे, सुरेश कचे, बाळासाहेब आंधळे, रवी गायकवाड, गणेश सागरे, योगेश कासर्ले यांनी केली.
