
वाळुज महानगर (ता.22) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने प्रवासी रिक्षाला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षामधील दोन जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी 21 जून रोजी रात्री 7:45 वाजेच्या सुमारास जीकठाण फाट्यावरील वीस नंबर खोली जवळ झाला.
या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील ज्ञानेश्वर चोरमारे वय अंदाजे 35 व त्याचा साथीदार असे दोघे शनिवारी 21 जून रोजी रात्री प्रवासी रिक्षा (एम एच 20, ए ए-3002) मधून रांजणगाव (शेणपुंजी) येथून वाळुज मार्गे गंगापूरकडे जात होते. छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील जीकठाण फाटा, 20 नंबर खोलीजवळ अज्ञात वाहनाने चोरमारे यांच्या रिक्षाला जोराची धडक दिली. रात्री 7:45 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात रिक्षाने तीन पलट्या खाल्ल्या. या अपघातात ज्ञानेश्वर चोरमारे व त्याचा साथीदार (नाव समजू शकले नाही) असे दोघे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच दहेगाव बंगला येथील गणेश राऊत व पप्पू खरात यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व नंदू सातपुते यांच्या मदतीने जखमींना छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले.
