
वाळूजमहानगर, (ता.17) – भरधाव जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवाय बसने ब्रिझा कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार मधील एक जण जागीच ठार तर पाच जण जखमी झाले . जखमीतील दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात सोमवारी (ता.17) रोजी पहाटे वाळुजवळ झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्याहून देऊळगाव (मही) ला जाण्यासाठी ब्रिझा कार (एम एच 28, एफ झेड – 5786) ने निघालेले 6 प्रवाशी छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील शिवराई टोलनाक्याच्या अलीकडे थांबलेले असताना एसटी महामंडळाच्या शिवाय बसने त्यांच्या कारला पाठीमागून जोराची धडक दिली. शिवराई टोलनाक्याजवळ सोमवारी (ता.17) रोजी पहाटे 4:32 वाजता झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच जखमींना जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी तात्काळ अपघात स्थळी धाव घेत जिल्हा रुग्णालय (घाटी) येथे दाखल केले. 
या अपघातात कारमधील सय्यद जावेद सय्यद हबीब (वय 33) हा जागीच ठार झाला. तर कलीम खान रहीम खान वय 39, समीर शेख वय 23, शेख सलीम वय 24, बबलू खान बाबू वय 28, शेख इरशाद हे जखमी झाले आहेत. जखमीतील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले करीत आहे.
