वाळूजमहानगर (ता.26) :- भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात ट्रकने अनोळखी पादचाऱ्यास जोराचे धडक दिल्याने त्याचा चेंदामेंदा होऊन जागीच ठार झाला.
हा अपघात बुधवारी (ता.26) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास वाळूज महामार्गावरील बजाज कंपनी समोर झाला.
वाळुज औद्योगिक वसाहतीतील बजाज कंपनीच्या वॉल कंपाऊंड जवळच एका इसमाचा मृतदेह चिरडलेल्या अवस्थेत पडलेला असल्याची माहिती बजाजनगर येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज जैन यांनी पोलिसांना दिली.
बुधवारी (ता.26) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास मिळालेल्या या माहितीवरून वाळुज एमआयडीसी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत पाहणी केली. तेथे अंदाजे 45 वर्षीय अनोळखी इसम चिरडलेल्या अवस्थेत पडून होता. त्याच्या डोक्यावरून अज्ञात ट्रकचे चाक गेल्याने त्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. हा मृतदेह वाळुज एमआयडीसी पोलिसांनी घाटीत दाखल केला. या अपघातात ठार झालेल्या इसमाची ओळख पटली नसून अपघात केल्यानंतर ट्रक चालक वाहनास अपघातस्थळावरून फरार झाला. या घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.