March 24, 2026

 

वाळूज महानगर, (ता.23) -सुमारे पाच महिन्यापासून सुरू असलेल्या व अनेक आरोप प्रत्यारोपाने रंगलेल्या जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या महानाट्यावर अखेर सोमवारी (ता.22) रोजी पडदा पडला. येथे झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत ठरल्याप्रमाणे योगिता रामेश्वर आरगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदाची निवड अनपेक्षित झाली. उपसरपंचासाठी दोन उमेदवारी अर्ज आल्याने अटीतटीच्या लढतीत नजीरखा पठाण यांचा अवघ्या एका मताने विजय झाला. मात्र सर्व सदस्यांच्या एकमताने निवडून आणलेले बिनविरोध सरपंच नेमके कोणत्या गटाचे ? याबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे.

वाळूज परिसराततील जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम मानल्या जाते. येथे 17 सदस्य आहेत. मात्र त्यापैकी तेरा सदस्यांनी एकत्र येत तत्कालीन सरपंच गजानन बोंबले व उपसरपंच प्रवीण दुबिले यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर जोगेश्वरी ग्रामपंचायतच्या महानाट्याला सुरुवात झाली. अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर सहलीवर गेलेल्या सदस्यांमध्ये व सहलीवर न गेलेल्या सदस्यांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. दरम्यान हे महानाट्य चांगलेच रंगले. त्यात काही राजकीय पक्षाने उडी घेतल्याने जोगेश्वरी ग्रामपंचायतच्या राजकारणातील या महानाट्याची इतिहासात नोंद होईल असे घडले. त्यात अपहरण, झोंबाझोंबी, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, अविश्वास ठरावावरुन एकमेकांविरुद्ध अपील करणे, तत्कालीन सरपंचावर गुन्हा दाखल होणे, अविश्वास ठराव दाखल करणारे सदस्य फुटणे, दाखल केलेले प्रकरण पुन्हा परत घेणे. अशा अनेक घटना विषयी प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्याचे सर्वश्रुत आहे.

अविश्वास ठराव दाखल करून तो पारित करणारे सदस्यच फुटल्याने जोगेश्वरीचा राजकारणाला वेगळीच कलाटणी बसली. आणि पुन्हा बहुमताचा आकडा गाठत सदस्य सहलीवर रवाना झाले. सुमारे महिनाभर सहल झाल्यानंतर परत येईपर्यंत बहुमत होते. ठरल्याप्रमाणे सरपंचपदाच्या निवडणुकीत योगिता रामेश्वर आरगडे यांचा एकमेव अर्ज दाखल केला. आणि त्यांची सर्व 17 सदस्यांनी मिळून बिनविरोध निवड केली. मात्र त्यानंतर पुन्हा तीन सदस्य फुटले आणि उपसरपंचपदाच्या निवडणुकीला कलाटणी बसली.
उपसरपंचपदासाठी प्रभाकर सूर्यभान काजळे आणि नजीरखा फकीरखा पठाण असे दोन उमेदवार अर्ज दाखल झाले. त्यामुळे उपसरपंचसाठी गुप्त पद्धतिने मतदान घेण्यात आले. यात नजीर खा पठाण यांना 17 पैकी 9 तर प्रभाकर काजळे यांना 17 पैकी 8 मते मिळाले. उपसरपंचाच्या निवडणुकीत बहुमतातील तीन सदस्य फुटल्याने अल्पमतातील संख्या वाढली आणि केवळ एका मताने नजीरखा पठाण यांची उपसरपंचपदी निवड झाली. यावेळी अध्याशी अधिकारी म्हणून रूपाली देविदासराव मोगलकर, मंडळ अधिकारी संतोष इथापे, तलाठी एस.टी. गवळी, ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे यांनी काम पाहिले.

या निवडणुकीत योगिता रामेश्वर आरगडे, नजीरखा फकीरखा पठाण, प्रवीण बाबासाहेब दुबिले, योगेश पंढरीनाथ दळवी, शाहीन मोईस शेख, शिलाबाई सुरेश वाघमारे, हिरा विलास सौदागर, भारती गणेश साबळे, मीना पंडित पनाड, शांताबाई मन्साराम बिलवाल, सोनू अमोल लोहकरे, रुक्मिणी कृष्णा काजळे, संगीता गणेश ठोकळ, प्रवीण परसराम थोरात, प्रभाकर सूर्यभान काजळे, अनिल चांगदेव वाघ आणि गजानन कारभारी बोंबले यांनी भाग घेतला. निवडणुकीनंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर फटाक्यांच्या आतषबाजीत करून गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला. दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला. सुमारे पाच महिने अनेक घटनाघडामोडींनी रंगलेल्या जोगेश्वरी ग्रामपंचायतच्या महानाट्याचा सोमवारी पडदा पडला. मात्र सर्व 17 सदस्यांच्या एकमताने निवडून आणलेले बिनविरोध सरपंच नेमके कोणत्या गटाचे ? याबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *