वाळूजमहानगर (ता.10) :- गेल्या अनेक महिन्यापासून जोगेश्वरी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली धुसपुस चव्हाट्यावर आली. आणि तेरा सदस्य सहलीवर गेले. त्यातील काही सदस्य फोडण्याचा प्रयत्नही झाला. परंतु त्यात अपयश आले. आणि अखेर सरपंच व उपसरपंच यांच्यावर शुक्रवारी (ता.10) रोजी अविश्वास ठराव दाखलच झाला. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन ही करण्यात आले.
वाळूज परिसरातील जोगेश्वरी ग्रामपंचायत ही आर्थिक दृष्ट्या अत्यंत सक्षम आहे. त्यामुळेच या ग्रामपंचायतीवर सत्तेसाठी राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत आहे. एकेकाळी या ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचे वर्चस्व होते. गेल्या निवडणुकीत या सरपंच पदाची सत्ता शिवसेनेकडे आली. येथे सरपंचपदी गजानन बोंबले तर उपसरपंचपदी प्रवीण दुबिले विराजमान झाले. सर्व काही आलबेल असताना विकास कामे करण्याऐवजी राजकारणच जास्त सुरू झाले. त्यावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या. आणि 17 पैकी 13 सदस्य एकत्र आले. आणि सुरू झाली सहलवारी. ही सहल सुरू असतानाच विरोधकांनी एक जरी सदस्य फोडला. तरी हा अविश्वास ठराव बारगळला जाऊ शकतो. म्हणूनच जळगाव येथील एका हॉटेलमध्ये जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्यांचे अपहरण महानाट्यही चांगलेच रंगले. त्यामुळे रात्र वैऱ्याची आहे, सावध भूमिका घ्यायला पाहिजे. म्हणून एकत्र आलेल्या 13 सदस्यांनी शुक्रवारी (ता.10) रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करत थेट गंगापूर तहसील गाठले. आणि सरपंच गजानन बोंबले व उपसरपंच प्रवीण दुबिले यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. या ठरावावर योगेश दळवी, प्रभाकर काजळे, नजीरखा पठाण, प्रवीण थोरात, अनिल वाघ, शिला वाघमारे, रुक्मिणी काजळे, भारती साबळे, हिरा सौदागर, मीना पनाड, योगिता आरगडे, शाईन शेख आणि संगीता ठोकळ आदींची नावे व स्वाक्षऱ्या आहेत. या ठरावावर चर्चा करण्यासाठी (ता.16) रोजी विशेष सभा होणार आहे. त्यात हा अविश्वास ठराव पारित होतो की, फेटाळला जातो. हे निश्चित होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष येत्या 16 फेब्रुवारी कडे लागले आहे.
सर्वपक्षीय अविश्वास ठराव –
हा अविश्वास ठराव सर्वपक्षीय आहे. अविश्वास ठराव दाखल करणाऱ्यांमध्ये शिवसेना, भाजपा, काँग्रेस अशा सर्वच राजकीय पक्षांच्या ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. जरी सरपंच व उपसरपंच शिवसेनेचे असले आणि अविश्वास ठराव दाखल करणाऱ्यांमध्ये जरी शिवसेनेचे पदाधिकारी असले. तरी पक्ष बाजूला ठेवून केवळ सरपंच, उपसरपंच यांच्यावर हा वैयक्तिक अविश्वास ठराव दाखल आहे. अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे उपतालुका अधिकारी रमेश आरगडे यांनी यावेळी दिली.
