
वाळूजमहानगर, (ता.13) – छत्रपती संभाजीनगर येथील समाजकल्याण विभागाचे संत तुकाराम, मिलिंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जिन्सी मुलांचे वसतिगृह आणि मुलींचे शासकीय वसतिगृह येथील जवळपास 40 वर्षांपासूनच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा “ऋणोत्सव 2024”, 7 एप्रिल रोजी संत एकनाथ रंगमंदिरात अत्यंत भावनिक वातावरणामध्ये झाला.
शासकीय वसतिगृहामुळे हजारो गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचे ध्येय पूर्ण करता आले व वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गगन भरारी घेऊन यशाची उंच शिखरे गाठता आली. त्यातील अनेकजण आरोग्य सेवा, अभियांत्रिकी, शिक्षण क्षेत्र , प्रशासकीय सेवेत अधिकारी आहेत तसेच अनेकजण विदेशात नोकरीस आहेत.
स्नेहमिलन सोहळ्याचे मुख्य ऊद्दीष्ट म्हणजे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारे गृहप्रमुख, गृहपाल तसेच वसतिगृहातील कर्मचाऱ्यांसह समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, जुन्या मित्रांना भेटणे व जुन्या आठवणींना उजाळा देणे, डिजिटल डेटासह सर्व वसतिगृह माजी विद्यार्थ्यांचे नेटवर्क तयार करणे, वसतिगृहातील सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि ही योजना राज्यभर देशपातळीवर राबवणे हा आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून माजी सनदी अधिकारी तथा महाराष्ट्राचे माजी सचिव आर के गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ‘कलाटणी‘ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. या प्रसंगी माजी गृहपाल तथा गृहप्रमुख एम डी खिल्लारे, एस जी चौधरी, एस एस बनसोडे, एफ वी पठाण, एस के दाभाडे, मिरा मेटकर, एस पी सुरडकर, एस एन नरवडे यांचा स्मरणचिन्ह, सेवागौरव सन्मानपत्र देऊन सत्कार
करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यमान गृहपाल के वाय घनसावंत, एस आर थिटे, आझाद शेजुळ, पी आर सोळंके व वसतीगृहातील क्लर्क, शिपाई, सफाई कामगार तथा समाज कल्याण खात्यातील कर्मचारी यांचा देखील सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना एस एस बनसोडे यांनी सेवेत असताना केलेल्या प्रामाणिक कार्याची पावती मिळाल्याची भावना व्यक्त केली. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा समाजकल्याण अधिकारी नंदा धावारे यांनी वसतिगृहात विद्यार्थी हिताच्या घेतलेल्या अनेक निर्णयाची माहिती दिली. मुख्य वक्ते म्हणून लेखक, समीक्षक प्रा. ऋषिकेश कांबळे यानी आपल्या मार्गदर्शनात वसतिगृहे सुरू कसे झाले याची ऐतिहासिक माहिती देत अनेक विद्यार्थ्याना आपल्या पायावर उभे करणारे संत तुकाराम व मिलिंद वसतिगृह कसे बांधुन तयार झाले याच्या विषयी महत्त्वाची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात आर के गायकवाड यांनी शासकिय वसतिगृह कशी गोरगरीब, गरजू व गुणवंत मुलांसाठी यशस्वी जीवनाचा पाया रचतात तथा त्यांना ताठ मानेनं स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतात याचे सविस्तर विवेचन केले.
कार्याक्रमाच्या दुपारच्या सत्रात ‘वेध भविष्याचा’ या सदरात उच्च पदस्थ माजी विद्यार्थी आय आर टी एस सेवेतील मिलिंद हिरवे, सा. बां. कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, माजी तांत्रिक ऊर्जा सल्लागार यू जी झाल्टे, महावितरणचे माजी मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सूक्रे आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.
अध्यक्षीय भाषणात वरिष्ठ माजी विद्यार्थी, माजी शिक्षण संचालक तथा मिलींद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एम ए वाहुळ यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे आजच्या काळानुरूप अपेक्षित भूमिका, वसतिगृहात विद्यार्थ्यांची जबाबदारी, भविष्यातील आव्हाने, शिक्षण गुणवत्ता, यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच भास्कर सरोदे यांनी शिक्षण व आरोग्य याबाबत काही ठराव मांडले.
हा नेत्रदीपक सत्कार समारंभ भाऊकतेने व्यापलेला तर होताच तसेच कित्येक क्षणी उपस्थितांचे डोळे ओलावून गेला. प्रतिनिधिक स्वरूपात काही माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्याक्रमाचे प्रास्तविक डॉ. आण्णासाहेब बनसोडे यांनी, सूत्रसंचालन डॉ. पंकज झीने यांनी तर आभार प्रा. हेमंत जाधव यांनी मानले. रवींद्र शेजूळे व विक्रांत खाडे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सादर केलेले ऋदयस्पर्शी गीत “जिना यहाँ मरना यहाँ, इसके सीवा जाना कहाँ” सर्वांना अत्यंत भावुक करून गेले.
या कार्यक्रमाच्या नियोजन व यशस्वितेसाठी डॉ. आण्णासाहेब बनसोडे, मनोज उखंडे, डॉ. पंकज झीने, अजय खाजेकर, दत्तू खंडागळे, प्रा. हेमंत जाधव, प्रा. कैलास अंबुलगेकर, भास्कर सरोदे, डाॅ. ईश्वर भारती, आदिनाथ गायकवाड, डॉ. प्रकाश कदम, विलास शेजुळ, राज पवार, आदिनाथ गायकवाड, तसेच मुलींच्या वसतिगृहाच्या माजी विद्यार्थीनी डॉ. सुुनिता राऊत, मीरा बोडेॅ, स्वाती गवई आदींनी परिश्रम घेतले.
