March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.2) – विद्युत वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे लोंबकळलेल्या तारा एकमेकींना घासून तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन पाईप व इतर साहित्य जळून नुकसान झाले. वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करणाऱ्या महावितरणच्या या गलथान कारभारामुळे गोलवाडी येथील शेतकरी कुटुंब हतबल झाले आहे. हे शॉर्टसर्किट शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे झाले.


याबाबत माहिती अशी की, वाळूज परिसरातील गोलवाडी येथील
देविलाल मगनलाल सलामपुरे, कमलेश देवीलाल सलामपुरे, ऋषिकेश देवीलाल सलामपुरे यांची गोलवाडी गट नं. 68 मध्ये वडिलोपार्जित शेत जमीन आहे. या जमिनीमधून महावितरण कंपनीचे पोल व विद्युतवाहक तार गेलेली आहे. हे पोल खराब झालेले आहे, तसेच तारा या जमिनीवर लोंबळत आहे. याबाबत कित्येक वेळा महावितरण कंपनीकडे पोल बदलून नवीन पोल उभारण्याची मागणी करीत आहोत. तसेच आमचे मुला-बाळांसह शेतात वावरणे असल्याने शेतातील पोल व तारांमुळे सलामपुरे यांच्या कुटुंबाच्या जिवाला धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशी तक्रार सलामपुरे यांनी हे शॉर्टसर्किट होण्या अगोदर बऱ्याच वेळा केलेली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले. शुक्रवारी रोजी रात्री 1.35 वाजेपासून ते पहाटे 2 वाजेपर्यंत विद्युत तार एकमेकांना घासून 10 ते 12 फुट ज्वाला उसळल्या त्यामुळे शेतातील शेती साहित्यासह पाईप जळून नुकसान झाले. या शॉर्ट सर्किटचे चित्रण वस्तीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आले आहे. हे शॉर्टसर्किट इतके भयानक होते की, अर्धा तास विद्युत तारा जळत होत्या.

दरम्यान महावितरण कंपनीला फोन करूनही याकडे लवकर कोणी फिरकले नाही. विद्युत कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतात वस्ती करून राहणाऱ्या सलामपुरे कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो. याठिकाणी नेहमीच विद्युत वितरणामध्ये बिघाड होत असून फ्युज राहत नाही. त्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही, मोटार सुरू करता येत नाही, असा प्रकार हा सलग 20 दिवसांपासून सुरू असून वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी सलाम पुढे कुटुंबांनी केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *