वाळूजमहानगर, (ता.3) – शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी व पूर्वश्रमीचा शिवसेना उबाठाचा व आता भाजपामध्ये दाखल झालेला ग्रामपंचायत सदस्य यांच्यात बजाजनगर येथे रविवारी (ता. 2) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तुफान राडा झाला. निमित्त होते किरकोळ धक्का लागल्याचे. मात्र या घटनेमुळे बजाजनगर येथील राजकीय वातावरण संपूर्णपणे ढवळून निघाले आहे. दरम्यान दोघेही वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सागर पितांबर शिंदे हा वडगाव (को.) बजाजनगर ग्रामपंचायतचा सदस्य आहे. शिवाय याचे बजाजनगरातील जागृत हनुमान मंदिराजवळील अग्रवाल कॉम्पेल्केस जवळील देवगीरी स्टील समोर मेडिकल दुकान आहे. तर त्याच्या समोरील बाजूला वडगाव (को.) बजाजनगर ग्रामपंचायत सदस्य विजय दत्तात्रय सरकटे याचे हेल्थ जिम आहे. सरकटे हा पूर्वाश्रमीचा उबाठा गटाचा पदाधिकारी होता. मात्र तो नुकताच भाजपामध्ये आला आहे. रविवारी (ता. 2) रात्री 9:30 वाजेच्या सुमारास सागर शिंदे हा त्याच्या कारमध्ये बसून घराकडे निघाला होता. 
त्याच वेळी समोरून दुचाकीवरून दोघे आले. धक्का लागण्याच्या कारणावरून त्यांचा व सागर शिंदे याचा वाद सुरू झाला. त्यावेळी एक तरुण त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करत असतांना सागर शिंदे आणि मध्यस्थी करणाऱ्या तरुणात शिवीगाळ होऊन भांडणे झाली. त्यानंंतर सागर शिंदे, विजय सरकटे त्यांच्या कार्यक्रत्यामध्ये शिवीगाळ व बाचाबाची झाली. ही बाचाबाची शिगेला पोचल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावल्याने फायटर आणि लाकडे दांडाने हाणामारी झाली. यात सागर याच्या डोक्याला तर विजय सरकटे याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. जखमी विजय सरकटे याच्यावर बजाजनगर येथील घृष्णेश्वर हॉस्पिटलमध्ये तर सागर शिंदे याच्यावर स्वामी समर्थ हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.
शिंदे गट आणि भाजपा पदाधिकाऱ्यात हाणामारी झाल्याची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी हे जबाब नोंदवण्यासाठी रूग्णालात गेले. मात्र दोघेही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. दोघांचा जबाब आला की, गुन्हा दाखल करण्याची प्रकिया होईल. असे वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले.
