
वाळूजमहानगर, (ता.28) – महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी आहे. संतांचा धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक वारशाची जोपासना व वृद्धिंगत व्हावा, वारकरी परंपरा सामाजिक विकासाकरीता समाजात टिकून रहावी. या अनुषंगाने बजाजनगर येथील शिवछत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विठ्ठल हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदुंग वाद्याच्या चालीवर वारकरी दिंडी बुधवारी (ता.28) रोजी काढण्यात आली. 
हाती टाळ, विना, मृदुंग, तुळशीवृंदावन, ध्वजपताका आणि पालखी घेऊन वारकरी वेशभूषेत बालवर्ग ते 4 थी च्या विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ या महान वारकरी संप्रदायातील संतांची वेशभूषा परिधान करून बुधवारी (ता.28) रोजी मोठ्या उत्साहात दिंडी काढण्यात आली. शिवछत्रपती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तथा संस्थेच्या अध्यक्षा विद्या भोसले व संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर जाधव यांनी प्रथम पालखीचे पूजन करून वारकरी संप्रदायातील संतांना वंदन केले व विठ्ठलाचा गजर करत डोक्यावर तुलसी वृंदावन, हाती टाळ मृदुंग घेऊन पालखीसह हरीनाम-विठ्ठलाचा गजर करत वारकरी दिंडी निघाली. बजाजनगरातील भागातून परिक्रमा करत ही दिंडी विठ्ठल – रुक्मीणी मंदिरात पोहचली. तेथे दिंडीतील वारकऱ्यांनी गोल रिंगण करून संत तुकारामाचे अभंग गायले. 
तसेच वारकरी दिंडीतील बाल वारकर्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी शिवछत्रपती विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले यांनी मार्गदर्शन केले. दिंडी यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका अश्विनी करंजे, संध्या ढवळे, पूनम शर्मा, रेवती तायडे, अर्चना भगत, स्वाती शिरसाठ, मंगल पाटील, संध्या ढवळे, गणेश लोंढे, नागेश कदम, अमोल चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
