
वाळूज महानगर, (ता.13) – मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीने जात असताना शाळेच्या बसने अचानक वळण घेतल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह त्याचा मुलगा जखमी झाला. सिडको महानगर-1 अंतर्गत तिसगाव चौफुलीजवळ 27 डिसेंबर रोजी झालेल्या या अपघाताप्रकरणी 12 जानेवारी रोजी बस चालकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तिसगाव येथील दीपक सूर्यभान जाधव (वय 45) हे 27 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 7 वाजता मुलगा तन्मय याला शाळेत सोडण्यासाठी दुचाकी (एमएच 20, सीएल- 0182) वरून जात होते. त्यांना वडगाव–तिसगाव रोडवरील साई गगन लॉन्ससमोर बस (एमएच 20, सिटी-1705) ने अचानक वळण घेत दुचाकीला धडक दिली.

या अपघातात दीपक जाधव व त्यांचा 7 वर्षाचा मुलगा तन्मय हे दोघेही जखमी झाले. अपघात होताच बाळू देवरे व आप्पासाहेब डोंगरे यांनी जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी जखमी दीपक जाधव यांच्या फिर्यादीवरून बस चालकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
