March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.5) – गोशाळेसाठी घेतलेल्या शेतीचे सपाटीकरण करत असताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने ट्रॅक्टर चालवणारा मालक जागीच ठार झाला. ही घटना एकलहेरा येथे शनिवारी (ता.4) दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुधाकरराव सोनाजीपंत तिळवे रा. सद्गुरू हौसिंग सोसायटी एन 8 छत्रपती संभाजीनगर यानी गोशाळा सुरू करण्यासाठी एकलहेरा शिवार (गट नं 99) मध्ये पाच सहा महिन्यापूर्वी शेती विकत घेतली. गेल्या काही दिवसांपासून शेती सपाटीकरणाचे काम सुरू होते. शनिवारी (ता.4) रोजी मिनी ट्रॅक्टरने रोटा मारत असताना दुपारी 2 वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरचालक जेवण करण्यासाठी घरी गेला होता. यामुळे सुधाकरराव तिळवे यांनी स्वत: ट्रॅक्टर सुरू करून रोटा मारण्यास सुरुवात केली. याचवेळी ताबा सुटल्याने तिळवे हे ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळले. यावेळी झालेल्या आवाजामुळे बाजूच्या शेतात काम करणारे माणिकराव चामे धावत घटनास्थळी आले असता, सुधाकरराव तिळवे हे ट्रॅक्टरसह विहिरीत कोसल्याचे दिसले. चामे यांनी गावातील बाबासाहेब गायकवाड, शाम जोशी, बाळु गांगर्डे यांना तसेच एमआयडीसी वाळूज पोलिसांना कळवले.

 

ही माहिती मिळताच पोउपनि संदिप काळे, पोअं प्रशांत सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत पदमपुरा अग्निशमन दलाच्या ड्युटी अधिकारी लक्ष्मण कोल्हे, जवान संग्राम मोरे, शिवसंभा कल्याणकर, आप्पासाहेब गायकवाड, विजय कोथमीरे, महिंद्र कोथमीरे, केतन घाडगे, चंद्रसिंग गीते आदींच्या मदतीने सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास सुधाकरराव तिवळे यांना बेशुध्दावस्थेत बाहेर काढले. त्यांना खाजगी रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. दरम्यान, विहीर खोल असल्याने ट्रॅक्टर बाहेर काढता आले नाही. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *