वाळुज महानगर, (ता.10)- मुस्लिम समाज बांधवात पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यानिमित्त वाळूज परिसरातील पंढरपूर येथील जामा मस्जिदवर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने संपूर्ण मस्जिद उजाळून निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावर वाळूज परिसरातील पंढरपूर येथे जामा मस्जिद आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर कडक उपवास करतात. दिवसभराच्या उपवासानंतर सायंकाळी नमाज होते. यावेळी सर्व समाज एकत्र येतो. येथील जामा मस्जिदवर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने ही मस्जिद सप्त रंगात न्हावून निघाली आहे. त्यामुळे प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मस्जिद समोर वेगवेगळे अन्नपदार्थ विक्रीस असतात. काही समाज बांधव तेथेच उपवास सोडतात. गुरुवारी (ता.11) रोजी रमजान ईद हा सण साजरा होत असल्याने मुस्लिम बांधवांनी ईदची सर्व तयारी केली असून, बाजारपेठेत फळे, सुकामेवा तसेच नवीन वस्तू, कपडे खरेदीलाही प्राधान्य दिले जात आहे. विशेष म्हणजे मुस्लिम समाजाकडून हिंदू बांधवांसाठी शीरखुर्माचे आमंत्रणही आजच देण्यात आले आहे.
