March 25, 2026

वाळुज महानगर, (ता.2) – अपघातासंबंधात करण्यात आलेल्या कडक कायद्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी विविध वाहनांचे चालक रस्त्यावर उतरल्याने वाळुजजवळ मंगळवारी (ता.2) रोजी चक्काजाम झाला. मात्र वेळीच पोलिसांनी धाव घेऊन समजावून सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता केंद्र सरकारने वाहन चालकाविरोधात कडक कायदा केला. या कायद्यानुसार अपघातानतर जखमीला रुग्णालयात न पोहचवल्यास वाहन चालकांला 10 वर्ष शिक्षा आणि 7 लाख रुपये दंडाची शिक्षा आहे. या कायद्यामुळे अनेक चालक रोजगारापासून हिरावले जाण्याची शक्यता आहे. शिवाय कुटुंब उघड्यावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात ठिकठिकाणी वाहनचालकांनी काम बंद आंदोलन सुरु केले. शिवाय चालकांनी वाहने उभी केल्याने दळणवळण ठप्प झाले आहे. हा कायदा जिव्हारी लागल्याने तसेच तो वाहन चालकांसाठी अत्यंत निंदनीय आहे. म्हणून वाहन चालकांनी निषेध व्यक्त करत रस्त्यावर उतरले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील गरवारे कंपनीसमोर मंगळवारी (ता.2) रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चक्काजाम करण्यात आला.

पोलिसांची वेळीच धाव
या आंदोलनाची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक गणेश ताठे, वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस ए दिलवाले, संदीप शेवाळे यांनी फौजफाट्यासह धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

अवाहनाचे जल्लोषात स्वागत –
मोर्चा, रास्ता रोको असे आंदोलन म्हटले की, पोलिसांवर रोष व्यक्त करण्यात येतो. हे आता नित्याचेच झाले आहे. मात्र वाळूज येथे मंगळवारी झालेल्या ट्रक चालकाच्या आंदोलनात पोलिसांविषयी वेगळाच अनुभव पाहायला मिळाला. त्यांचे असे झाले की, ट्रक चालकाने अचानक आंदोलन केल्याची माहिती मिळताच फौजफाट्यासह वाळूज पोलीस ठाण्याचे
उपनिरीक्षक एस ए दिलवाले हे चक्काजाम आंदोलनस्थळी गेले. त्यावेळी वाहनचालक केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत रस्त्यावर उतरलेले होते. त्यांचा रोषपूर्ण आवेश पाहून उपनिरीक्षक एस ए दिलवाले यांनी आंदोलनकर्त्या वाहन चालकांना विश्वासात घेऊन कायदा व सुव्यवस्थेबाबत समजावून सांगितले. तसेच आंदोलन करण्याची पद्धत व नियमसुद्धा सांगितले. ते वाहन चालकांना इतके पडले की,

त्यांनी पोलीस उपनिरीक्षक एस ए दिलवाले यांना चक्क खांद्यावर घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. तसेच त्यांच्या या मार्गदर्शनाचे तंतोतंत पालन करून पुढील आंदोलन कायदा हातात न घेता रीतसर व पोलिसांना निवेदन देऊनच करू अशी ग्वाही दिली. वाळूज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस ए दिलवाले यांच्या या समयोचित मार्गदर्शक भूमिकेमुळे वाळूज पोलीस ठाण्याची मान निश्चितच उंचावली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *