
वाळूजमहानगर, (ता.12) – मराठवाडा साहित्य परिषद आणि विजय शिक्षण प्रसारक मंडळाच्या बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 44 वे मराठवाडा साहित्य संमेलन 15 व 16 फेब्रुवारी 2025 रोजी होत आहे. यानिमित्ताने वाळूज परिसरातील सांस्कृतिक चळवळीस बळ मिळणार आहे. शिवाय दोन दिवस साहित्य रसिकांना भरगच्च साहित्य मेजवानी मिळणार आहे. अशी माहिती बुधवारी (ता.12) रोजी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष विजय राऊत, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले व कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी दिली.
या संमेलनाचे उद्घाटन 15 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे व आमदार अमित विलासराव देशमुख हे उपस्थित राहणार आहे. मराठवाडा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रानखळगी, पानघळी पिंडीवरचे विंचू, घरंगळण अशा गाजलेल्या कादंबरीचे लेखक डॉ.भीमराव वाघचौरे हे आहेत. साहित्यरसिक आणि विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव आणि संमेलनाध्यक्ष विजय राऊत हे स्वागत अध्यक्ष असून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले हे सहआयोजक आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने वाळूज परिसरात विविध लेखक, कवी, साहित्यिक, कलावंत, रसिक यांचा वावर असणार आहे. हा साहित्य संस्कार पुढील पिढी व सभोवतालच्या समाजात रुजावा यासाठी साहित्य संमेलनाचे विशेष महत्त्व आहे. संत, महंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यासाठी हे सर्वात मोठे साहित्य संमेलन असून अनेक नामवंत साहित्यिकांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. गेल्या चार दशकापासून कविता, कथा लेखन आणि साहित्य विश्वासाठी हे साहित्य संमेलन एक पर्वणी असते. केवळ आठ जिल्ह्यातील साहित्य प्रेमी यात सहभागी होत नसून संपूर्ण महाराष्ट्रातून साहित्य प्रेमी या संमेलनासाठी गर्दी करतात.
दगडोजीराव देशमुख महाविद्यालय परिसरात होणाऱ्या या संमेलनासाठी ‘विलासराव देशमुख साहित्यनगरी’ आकार घेत आहे. तसेच ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारपीठ’ आणि ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारपीठ’ या दोन स्वतंत्र व्यासपीठावर विविध परिसंवाद होणार आहेत. संमेलनाच्या पहिल्या दिवशी सामाजिक अस्वस्थते मागील खदखद जातीची की मातीची, यावर विशेष परिसंवाद होणार असून डॉ. साहेब खंदारे, डॉ. मुस्तजीप खान, डॉ. राजेंद्र गोणारकर डॉ. दुष्यंत कटारे हे यात सहभाग होणार आहेत. मराठवाड्यातील साहित्य नवे भाग नव्या वाटा या परिसंवादात डॉ.वसंत बिरादार, डॉ. महेश खरात, डॉ. रमेश रावळकर हे विचार मांडतील. तर एका ग्रंथावरील चर्चा या सदरामध्ये भारतीय संविधान यावर डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ.राज कुलकर्णी आणि मुक्ता कदम सहभागी होणार आहेत. या परिसंवादात सुषमा अंधारे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी निमंत्रितांचे कवी संमेलन रंगणार असून मराठवाड्यातील सुप्रसिद्ध कवी यामध्ये भाग घेतील. रविवारी (ता.16) फेब्रुवारी रोजी एका लेखकाची मुलाखत या भागामध्ये दलित किचन्स ऑफ मराठवाडा या पुस्तकाचे लेखक शाहू पाटोळे यांची मुलाखत होणार असून गीतांजली कुलकर्णी आणि भूषण कोरेगावकर या संवादात सहभागी होतील. या संमेलनाचे आकर्षण म्हणजे समाज साहित्य आणि चित्रपट व मालिका या विषयावर विशेष परिसंवाद होणार असून कवी, चित्रपट व पटकथा लेखक अरविंद जगताप या परिसंवादाचे अध्यक्ष असतील. ज्यामध्ये लोक कला लोकसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेले डॉ. गणेश चंदनशिवे, अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि अभिनेत्री चिन्मय सुमित हे सहभागी होतील. त्याच दिवशी एका अन्य परिसंवादामध्ये डॉ. सूर्यवंशी, राजाराम झोडगे, भाऊसाहेब राठोड हे मराठी अभिजात झाली पण पुढे काय या विषयावर चर्चा करतील. कथाकथन या प्रकारात राम निकम, नागनाथ पाटील, डॉ. भास्कर वडे, मेघना मनगटे हे सहभागी होतील. संमेलनात बालकुमार मेळावा देखील होणार असून याची विशेष तयारी सुरू आहे. गेनू शिंदे, श्रीमती जमाले, निशा काकडे, विनोद शिनकर, संजय एलवाड, गणेश घुले आदी यामध्ये सहभागी होणार असून यासाठी संमेलनाच्या पूर्वीच विविध शाळा, विद्यार्थ्यांमध्ये बाल कुमार गटात काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचा समारोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत होणार असून लेखक अरविंद जगताप यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आली.
या पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष विजय राऊत, स्वागत मंडळाचे विवेक जयस्वाल, मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव ढाले, डॉ. गणेश मोहिते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राहुल हजारे, उपप्राचार्य डॉ. संजय सांभाळकर, गणेश घुले, मनीष जैस्वाल, रमेश कोनडलकर, डॉ. युवराज धबडगे, प्रा. नागेश बोंतेवाड आदी उपस्थित होते.
” विशेष आकर्षण “
मराठवाडा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर आणि यशवंत कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रवींद्र तोरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्र प्रदर्शन तसेच प्रत्यक्ष चित्रकला कार्यशाळा होणार आहे. एकीकडे साहित्य संमेलन चालू असताना विलासराव देशमुख साहित्य नगरीमध्ये हे चित्र प्रदर्शन आणि कार्यशाळा संपन्न होईल. या कार्यशाळेचे उद्घाटन चित्रकार बैजू पाटील हे करणार आहे.
यामध्ये मराठवाड्यातील 15 चित्रकार विद्यार्थ्यांचा समावेश असणार असून त्यांनी काढलेली विविध चित्रे यावेळी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच संमेलन दरम्यान प्रत्यक्ष पेंटिंग पाहण्याचा अनुभव हा प्रेक्षकांना मिळणार आहे. अमूर्त चित्रकला, लँडस्केप पेंटिंग आदी प्रकार समजून घेता येणार आहे.
“ग्रंथदिंडी”
या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी कार्यक्रमाने होणार आहे. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन मसीआचे अध्यक्ष चेतन राऊत यांच्या हस्ते 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजता होईल. याप्रसंगी संमेलनाचे स्वागत अध्यक्ष विजय राऊत, प्राचार्य डॉ. राहुल हजारे आणि स्वागत मंडळाचे सर्व सदस्य तसेच मराठवाडा साहित्य परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहे. ग्रंथदिंडीची सुरुवात मोहटादेवी परिसर बजाजनगर येथील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून होईल. ग्रंथदिंडीसाठी सजवलेली पालखी अग्रभागी असेल. ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ ठेवलेले असतील. या पालखीला हारांची सजावट केली जाईल, जागृत हनुमान मंदिर येथील भजनी मंडळ ग्रंथदिंडीत समाविष्ट असेल. त्याला ढोल ताशाची साथ देण्यात येईल. या ग्रंथादिंडीमध्ये पारंपारिक वेशभूषा तसेच महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांसह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि अन्य शाळांचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सामील होतील.
“संमेलनाचे बोधचिन्ह”
या साहित्य संमेलनानिमित्त विशेष अशा बोधचिन्हाचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या विशेष चिन्हांमध्ये वाळूज औद्योगिक दर्शन, मराठवाड्यातील शेती, श्रम संस्कृती आणि कैलास लेणे. अशा सांकेतिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
