
वाळूजमहानगर, (ता.13) – युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड आणि प्रयास युथ फाउंडेशन यांच्या वतीने वाळूज, औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजन झोन प्रकल्प (शहरी घनवन) विकसित केल्या जात आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी (ता.11) मे 2023 रोजी करण्यात आले.
यावेळी एमआयडीसीचे मुख्य अभियंता राजेंद्र गावडे, कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी, प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, उपअभियंता गणेश मुळीकर, एमइसीसी चे संस्थापक बि. एस. खोसे, सीएमआयएचे उपाध्यक्ष दुष्यंत पाटील, आणि जोगेश्वरी ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन बोंबले, युबीएलच्या प्रतिनिधींमध्ये ब्रेवरी अध्यक्ष ओंकार वेंगुर्लेकर, अखिल शर्मा, सीएसआर हेड जैनी नथवानी, सस्टेनेबिलिटी आणि एचआर मॅनेजर भारती वानेरे, प्रयास युथ फाऊंडेशनचे संस्थापक रवि चौधरी आदी उपस्थित होते.
या प्रकल्पांतर्गत, सुमारे 5 एकर क्षेत्रामध्ये मियावाकी पद्धतीचा वापर करून 80 हून अधिक विविध भारतीय प्रजातींची 50 हजार रोपे लावली जात आहेत. या जंगलाचा विकास आणि देखभाल करण्यासाठी एमआयडीसीने यूबीएलला तीन वर्षांच्या कालावधीसाठी जमीन दिली आहे. हवेची गुणवत्ता सुधारणे, पर्यावरणीय संतुलन पुनर्स्थापित करणे आणि परिसरातील जैवविविधता वाढवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
यावेळी “आम्ही ‘केअर फॉर पीपल अँड प्लॅनेट’ या मूल्याने प्रेरित आहोत आणि अर्थपूर्ण सीएसआर प्रकल्प राबविण्यासाठी आम्ही प्रयास सारख्या संस्थानसोबत भागीदारी करून काम करीत राहू.” ते पुढे म्हणाले, “हे जंगल वड, पिंपळ, ताम्हण, मोह, बेहडा, पळस, अर्जुन, कदंब, पुत्रंजीवा आदी भारतीय मूळ प्रजाती रोपित करून विकसित केले जात आहे. मियावाकी पद्धतीच्या वृक्षारोपणामुळे वातावरणातील तीस पट जास्त कार्बन डायऑक्साइड शोषित करून दहापट वेगाने वाढू शकतात. जंगलाची घनता देखील सामान्य वृक्षारोपणाच्या तुलनेत जवळपास तीस पटीने जास्त असेल आणि लवकरच आपण एक भरभराटीचे जंगल पाहू शकू.” असेही ते म्हणाले. ऑक्सिजन झोन प्रकल्प हा यूबीएल च्या व्यावसायिक, सामाजिक जबाबदारी (सीएसआर) रणनीतीशी निगडित आहे. ज्यामुळे पर्यावरण संवर्धन आणि समुदायांसाठी शाश्वत सामाजिक विकास या दोन्हीसाठी अर्थपूर्ण योगदान दिले जाते.
