वाळूजमहानगर – वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड मध्ये भारताचे महान अभियंता आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभियंता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कंपनीतील सर्व अभियंत्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कंपनीचे मानव संसाधन विभाग प्रमुख व्यंकट मैलापुरे म्हणाले की, मोक्षगुंडम विश्वेश्वरा यांचा जन्मदिवस भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. विश्वेश्वरा 101 वर्षाचे निरोगी आयुष्य जगले, वयाच्या 98 व्या वर्षी सुद्धा ते सतत कार्यमग्न असायचे. नियमित व्यायाम व मोजकेच सकस आहार ते घ्यायचे. विश्वेश्वरा यांच्याकडून आजच्या युवकांना खूप काही प्रेरणा घेण्यासारखे आहे. वेळेचे ते काटेकोरपणे पाळत असत. एकदा ते विदेशात गेले असताना एक रेल्वे गाडी वेळेवर रद्द झाल्यामुळे तेथे त्यांनी स्टेशन मास्तरला एवढे फैलावर घेतले की, खास त्यांच्यासाठी एका डब्याची विशेष गाडी सोडण्यात आली. त्यानंतर ते वेळेवर पोचून त्यांची मीटिंग पूर्ण केली. ट्रेन ने प्रवास करतेवेळी रेल्वे रुळाच्या आवाजातील बदलावरून संभाव्य मोठा अपघात त्यांनी टाळला होता. मोक्षगुंडम विश्वेश्वरा हे धरण, पूल आणि राष्ट्रउभारणीचे शिल्पकार होते. मोक्षगुंडम विश्वेश्वरा यांनी स्वयंचलित दरवाजे या संकल्पनेची पेटंट 100 वर्षापूर्वी घेतले होते. त्यांना 1955 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळाला. यावेळी कंपनीतील इतर अभियंत्यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व्यंकट मैलापुरे यांनी केले. तर आभार विशाल सुतार यांनी मानले.
