
वाळूजमहानगर, (ता.18) – औद्योगिक वसाहतीमुळे वाळूज परिसरात गुन्हेगारीचे साम्राज्य वाढत असल्यामुळे धारदार तलवारी, जिवंत कडतूसचा वापर करण्यात येऊन लूटमारी केल्या जात आहे. यावर पोलिसांचा अंकुश नसल्यामुळे गुन्हेगारांचे वर्चस्व वाढले असून वाळूज परिसरात दहशत निर्माण केल्या जात आहे.

औद्योगिक वसाहतीमुळे भारताच्या प्रत्येक राज्यातील अनेक तरुण रोजगाराच्या शोधात येऊन वाळूज
स्थानिक झाला आहे. यातील बहुतांश तरुणांची नोकरी कायमस्वरूपी नसते. त्यामुळे अनेक जण रोजंदारी किंवा ठेकेदारीवर काम करतात. त्यांना योग्य मोबदला मिळत असल्याने पैशाची चणचण भासते. अशावेळी अनेक जण गुन्हेगारीकडे वळतात. येथे स्थानिक कामगाराशिवाय परप्रांतीयांची संख्या अधिक आहे. परप्रांतातून येणारे कुशलअकुशल कामगारांबरोबरच काही गुन्हेगारी प्रवृत्तीचेही तरुण येथे येतात. येताना तलवार, पिस्तूल, काडतूस, गावठीकट्टा अशी घातक शस्त्र घेऊन येत असावेत. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच वाळूज परिसरात घातक शस्त्रे व तीष्ण हत्यारे सर्रासपणे वापरताना अनेक जण मिळून येतात. म्हणूनच वाळूज परिसरात गुन्हेगारीचे वर्चस्व वाढल्याचे दिसून येते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांचा अंकुश नसल्याने वाळूज परिसरात लूटमारीसह हाणामाऱ्या, प्राणघातक हल्ले, खून, दरोडे असेल प्रकार सर्रास घडतात.
एकाच दिवसात दोन कारवाया –
वाळूज औद्योगिक परिसरासह रहिवासी क्षेत्रातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दररोज लूट मारी सह हाणामाऱ्या व प्राण घातक हल्ले होत आहे. याच उद्देशाने तलवार बाळगताना एकाला व पिस्तूलचा धाक दाखवून लुटणाऱ्या दुसऱ्याला पोलिसांनी अटक केली. या दोन्ही कारवाया एकाच दिवशी करण्यात आल्या.
तलवार बाळगणारा जेरबंद –
बजाजनगर या कामगार वसाहतीत
19 वर्षीय तरुण विनापरवाना व बेकायदेशीर रित्या धारदार तलवार बाळगताना मंगळवारी (ता.16) रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास मिळून आला. वाळूज एमआयडीसी पोलीसांनी त्यास पकडून अटक केली. भाग्येश दिलीप ढाके (19) रा.आर एक्स 6/20 ज्योर्तीलिंग समोर, अयोध्यानगर असे तलवार बाळगणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 2 फुट 5 इंच लांबीची व दीड इंच रुंदीची तलवार जप्त करण्यात आली.
पिस्टलचा धाक दाखवून लुटले –

पंढरपूर येथील शकुल संतोष राऊत हा रिक्षा चालक मंगळवारी (ता.16) रात्री 9 वाजेच्या सुमारास रिक्षा (एमएच 20 ई के -3047) पंढरपूरकडे येत असताना तो एएस क्लब उड्डान पुलाजवळ लघु शंकेसाठी थांबला असतांना त्याला अचानपणे एकाने खिशातील पिस्टल काढून पैशाची मागणी केली. शिवाय गोळ्या घालून मारून टाकीन अशी धमकी देत शकुलला पिस्टलने उजव्या पायाचे मांडीवर मारून जखमी केले. त्यानंतर पिस्टल कानाला लावून खिशातील 2 हजार रुपये काढून पळून गेला. या प्रकारानंतर वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरिक्षक अविनाश अघाव यांनी आरोपीचा शोध घेण्याकरीता पथक रवाना केले. त्याला गुरूवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास पोलीस पथकाने पठलाग करून त्यास ताब्यात घेतले. रोहित गणेश अंभोरे (रा. म्हाडा कॉलनी तिसगाव असे आरोपीचे नाव आहे. त्याची अंगझडती घेतली असता 70 हजार रुपये किमतीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस व 2 हजार रुपये रोख असा 72 हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात रोहित अंभोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि. दिपक रोठे करीत आहे.
