March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.15) – वाळूज औद्योगिक वसाहतील कमलापूर गट नंबर मधील एका कंपनीला व शेजारी असलेल्या दुचाकी गॅरेज तसेच एका पान टपरीला शनिवारी (ता.15) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीत कंपनीतील विविध मशिनरी, दुचाकी ऑफिस असा लाखो रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. वाळूज अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबाच्या मदतीने ही आग अर्धा ते पाऊण तासात आटोक्यात आणली.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील कमळापूर गट नंबर 28 मधील प्लॉट नंबर 10 येथे सचिन अशोकराव तारगे रा. बजाजनगर यांचे कंपनी शेड आहे. त्यातील एका शेडमध्ये रोहन पेरे पाटील यांची अभिषेक इंटरप्राईजेस ही डायकास्टिंगची कंपनी आहे. शेजारीच सागर दिलीप निकम रा. वासडी ता. कन्नड यांचे बाळूमामा नावाचे दुचाकी स्पेअर पार्ट व दुरुस्तीचे गॅरेज व त्यासमोर त्यांचीच पान टपरी आहे. शनिवारी (ता.15) रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सागर निकम हा गॅरेज व टपरी बंद करून घरी गेला होता. अवघ्या पंधरा मिनिटातच त्याला त्याच्या गॅरेजला आग लागल्याची माहिती फोन वरून मिळाली.

दरम्यान या आगीची माहिती वाळूज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ वाळूज अग्निशमन दलास पाचारण करत घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत अभिषेक इंटरप्राईजेस, बाळूमामा गॅरेज व बाळूमामा पानटपरीने मोठा पेट घेतला होता. वाळूज अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी ए एस देशमुख, ललित ब्राह्मणकर, एस जी वासनिक, एस के गायकवाड, वाय डी काळे, डी एन चंद, एस टी मुळे, प्रथमेश नागरगोजे, एस पी सोनवणे आदींनी शटर तोडून दोन बंबांच्या सहाय्याने ही आग अर्धा ते पाऊण तासाच्या पथक परिश्रमानंतर नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत अभिषेक इंटरप्राईजेस मधील विविध मशिनरी फर्निचर ऑफिस पूर्णपणे जळाले होते. तसेच शेजारीच असलेले बाळूमामा हे दुचाकीच्या गॅरेज गॅरेज मधील पाच दुचाकी तसेच विविध कंपन्यांचे स्पेअर पार्ट असा लाखो रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. याशिवाय समोर असलेली पान टपरी सुद्धा जळून मोठे नुकसान झाले.

 

दरम्यान वाळूज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद आबुज, रावसाहेब काकड, संदीप काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल काकासाहेब पंडित, पोलीस अंमलदार योगेश शेळके आदींनी घटनास्थळी जमलेली गर्दी दूर करून आगीवर नियंत्रण मिळविण्यास मदत केली. आगीचे प्रमुख कारण समजू शकले नाही.

मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत अभिषेक इंटरप्राईजेस, बाळूमामा दुचाकी गॅरेज पान टपरी मधील लाखो रुपयाचा ऐवज जळून असल्याचे रोहन पेरे पाटील व सागर निकम यांनी सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *