
वाळूजमहानगर, (ता.26) – अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील व रेकॉर्डवरील एका आरोपीला वाळुज एमआयडीसी पोलिसांनी अटक करून त्याच्या ताब्यातील 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यश अनिल साळवे याच्या जिजामातानगर सिडको महानगर -1, येथील घराच्या खिडकीतून हात घालून घरातील रिअलमी कंपनीचे दोन मोबाईल हॅण्डसेट, तसेच घराच्या समोरील बजाज कंपनीची पल्सर दुचाकी ( एम एच 19, ई एफ -0014) असा 31 हजार रुपये किमंतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने 16 मार्च रोजी रात्री 12 ते 3 वाजेच्या दरम्यान चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून गोपणीय माहितीच्या आधारावर आरोपी निष्पण करून मंगळवारी (ता.25) रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास आरोपी भारत राजू गडवे (वय 25) रा. सावित्रीबाई फुलेनगर वडगाव (को.) यास राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्या झडती मध्ये यश साळवे याची चोरी गेलेली दुचाकी व दोन मोबाईल असा 31 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळाला. तो जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सपोनि. मनोज शिंदे, सफौ. सुरेश तारव, पोअं. भगवान मगर, वैभव गायकवाड, श्रीकृष्ण कांबळे यांनी केली.
रेकॉर्डवरील गुन्हेगार –
आरोपी भारत राजू गडवे याच्यावर खून, अपहरण, बालकाचे लैगिंक अत्याचार (पोक्सो ) जबरीचोरी, चोरी, या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो अनेक दिवसापासून पोलिसांना हवा होता.
