
वाळूज महानगर, (वार्ताहर) – सिडको वाळूजमहानगर प्रकल्प अंतर्गत मोठी लोक वस्ती असलेल्या नगर -1 व 2 मधील मुख्य रस्त्याला प्राधान्य देऊन डांबरीकरण करण्यात यावे. अशी मागणी छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे भाजपा सरचिटणीस नागेश कुठारे यांच्या शिष्टमंडळाने सिडकोचे प्रशासक भुजंग गायकवाड यांना मंगळवारी 13 जानेवारी रोजी दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, सिडको वाळूजमहानगर प्रकल्प अंतर्गत मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. तसेच नगर 1 व 2 मध्ये मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. यामुळे दररोज छोटमोठे अपघात होत आहेत. त्यामुळे या दोन्ही नगरचे रस्त्यावरील डांबरीकरण प्राधान्य देऊन सर्वप्रथम करणे क्रमप्राप्त आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला सुचना देऊन रस्त्याचे कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावे. तसे न झाल्यास संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी. निवेदनावर नागेश कुठारे, तुषार फोफसे, भगवान खेडकर, आभिजीत चौरे यांच्या सह्या आहेत.
उच्च न्यायालयात दाद मागु –
ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही, अशा ठिकाणी (सिडको वाळूजमहानगर-4) सिडको डांबरीकरणास प्राधान्य देत आहे. हा सिडकोकडुन एकप्रकारे नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार दिसून येत आहे. सिडकोच्या महानगर 1 व 2 येथील रहिवाश्यांवर होत असलेला अन्यायच आहे. सिडको वाळूजमहानगर प्रकल्प अंतर्गत रस्ते व्हावेत म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जर आपण असे अन्याय परत करत असाल तर आम्ही परत या बाबत उच्च न्यायालयात दाद मागु. असा इशारा नागेश कुठारे यांनी दिला आहे.
