
वाळूजमहानगर, (ता.7) – सात तोळे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा पावणेपाच लाख रुपयांचा ऐवज ठेवलेली लोखंडी पेटी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही चोरीची घटना म्हाडा कॉलनी, सिडको वाळूज महानगर येथे बुधवारी (ता.7) रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तिसगाव परिसरातील म्हाडा कॉलनी येथे देवा वीरा महेर (वय 36) हे कुटुंबासह वस्तीवर राहतात. मंगळवारी कुटुंबासह सर्वजण जेवण करून झोपले असता अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून रोख रकमेसह दागिने ठेवलेली लोखंडी पेटी चोरून नेली. घरामध्ये ठेवलेल्या या लोखंडी पेटीमध्ये 3.50 तोळे सोन्याचे मंगळसूत्र, 3.50 तोळ्यांची सोन्याची चैन, 4.25 ग्राम चांदीचे कडे, नुकतीच विकलेल्या जुन्या गाडीचे रोख 2 लाख 50 हजार रुपये, विकलेल्या दोन म्हशीचे 1 लाख रुपये, दुध विक्रीचे 1 लाख रुपये व घरात ठेवलेले 25 हजार रुपये. असा एकूण 4 लाख 75 हजार रुपये ठेवलेले होते. असे देवा माहेर यांनी सांगितले. दरम्यान भागुबाई महेर व त्यांची दोन मुले हे घरात झोपेत असतांना अचानक पेटीची कडी वाजल्याचा आवाज आला. उठल्यानंतर त्यांना चोरटे पेटी घेऊन जातांना दिसले. भागुबाई यांनी आरडाओरड केली. त्यामुळे पतीसह वस्तीवरील इतर नातेवाई जागी होऊन त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून औरंगाबाद पुणे रोडने पसार झाले. या घटनेमुळे परिसरसत खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
