
वाळूजमहानगर, (ता.3) – बजाजनगर येथील राष्ट्रसंत सेना महाराज मंदिर सभागृहात आयोजित महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळच्या बैठकीत गंगापूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात तालुकाध्यक्ष म्हणून माणिकदादा राऊत, तालुका सचिव अशोक राऊत तर तालुका सोशल मीडिया प्रमुख म्हणून माधव भाले यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
यावेळी समाज बांधवांना महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष बोराडे यांनी विविध शासकीय, शैक्षणिक, सामाजिक योजना आणि कायद्याचे ज्ञान, भविष्यातील समाजावरील धोके यावर सखोल मार्गदर्शन केले. तालुका कार्यकारिणी निवडीचा प्रस्ताव महामंडळाचे संस्थापक शिवनाथ लिंगायत यांनी मांडला. त्याला सर्वानुमते मान्यता देऊन निवड करण्यात आली. उर्वरित तालुका कार्यकारिणी सर्कल बैठक व कार्यकारिणी, युवक कार्यकारिणी आणि वाळूज महानगर कार्यकारिणी 10 दिवसात पूर्ण करून जिल्हा कार्यकारिणीला अहवाल पाठविण्याचे आश्वासन नवनियुक्त पदाधिकारी माणिकदादा राऊत, अशोक बनकर व बजाजनगर अध्यक्ष गोपीनाथ सुरडकर यांनी दिले. तसेच कौटुंबिक सर्वेक्षण फॉर्म भरण्यासाठी तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल. असे आश्वासन नवनियुक्त पदाधिकारी यांनी दिले. यावेळी तालुक्यातील नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
