
वाळूजमहानगर, (ता.8) – बजाजनगर येथील राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक एड्स सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एड्स व आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस एस कादरी तर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय रुग्णालय औरंगाबादचे संजय पवार व डॉ. मनीषा शेळके उपस्थित होत्या.
यावेळी संजय पवार यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचा टर्निंग पॉईंट म्हणजे महाविद्यालयीन जीवन. या अवस्थेमध्ये एड्स सारख्या आजाराविषयी माहिती असणे किती आवश्यक आहे हे सांगितले. तसेच एड्स होण्याची चार कारणे व त्यापासून विद्यार्थ्यांनी स्वतःचे कसे संरक्षण करावे. याविषयी योग्य उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. एड्स होणार नाही, याची काळजी घेऊ व एड्स बाधितांची सामाजिक हेळसांड करणार नाही. अशी शपथही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्याचबरोबर डॉ. मनीषा शेळके यांनी विद्यार्थ्यांच्या चुकीच्या दिनश्चर्येचा व आहार पद्धतीचा त्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे सांगून योग्य दिनचर्या व आहार कसा असावा. हे पटवून दिले. पाश्चात्य पद्धतीचे अनुकरण न करता पूर्वापार चालत आलेल्या योग्य सवयी अंगीकारल्या तर विद्यार्थ्यांचे आरोग्य व बौद्धिक गुणवत्तेमध्ये नक्कीच वाढ होईल. असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संस्कृतीक विभाग प्रमुख जयश्री शेजुळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के पी मोरे, विद्या उगले, व्ही.के मालोदे, अनिता बोबडे, शारदा खरात, रंजना बावचे, अशोक जगताप, गोपीचंद गायके यांनी परिश्रम घेतले.
