
वाळूजमहानगर, (ता.19) :- श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव (शे. पुं.) येथे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी (ता.19) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने प्रति वर्षाप्रमाणे शिवाजी विद्यालयातील सेवा ज्येष्ठ शिक्षक अनिल श्रीकांतराव भांड यांना शिवश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन देवगिरी महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विषयाचे प्रा.डॉ.कल्याण माळी, शालेय समिती सदस्य सोमनाथ हिवाळे, केशव पाटील नंदनवणकर, द्वारकादास शामकुमारचे संचालक सदाशिव जाधव पाटील, देवगिरी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. चंद्रकांत गायकवाड, पर्यवेक्षिका सरोज पवार, शिवश्री पुरस्कार प्राप्त अनिल भांड उपस्थित होते. प्रथम शाळेच्या वतीने दिला जाणारा शिवश्री पुरस्कार अनिल भांड यांना पाहुण्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवकुमार होनराव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावरीलअनेक मुद्दे व घटना सांगून छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्याचा आढावा घेतला. प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. कल्याण माळी यांनी जगात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे अनेक राजांनी किल्ले जिंकले, युद्ध जिंकले, शत्रूचा नायनाट केला. परंतु जयंती फक्त शिवरायांचीच का होते. कारण इतर राजे, महाराजे, बादशहा लढत होते. स्वतःच्या साम्राज्यासाठी आणि शिवराय लढत होते रयतेच्या राज्यासाठी. म्हणून जगात शिवरायांची जयंती साजरी होते. असे सांगून अनेक घटनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश सुलताने, भगवान वनारसे, विजयसिंह परदेशी, संतोष बंडेवार, गणेश गिरे, मारोती सुरणर, काळेश्वर भुरे, गणेश कदम, रमा आडे, सविता गोसावी, आशा साळुंखे, तारामती जाधव, सतिश जावळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली सपकाळ, सूत्रसंचलन ज्योती भालेराव यांनी तर आभार भगवान वनारसे यांनी मानले.
