
वाळुज महानगर, (ता.20)- अयोध्येतील राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी भव्य उद्घाटन व प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे विविध मंदिरांची रंगरंगोटी करून आकर्षक लाइटिंग लावण्यात येणार आहे. सायंकाळी दीपोत्सव व किर्तनाचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने रामोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
भारतालाच नव्हे तर अख्या जगाला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे आकर्षण वाटत आहे. सुमारे 500 वर्षापासूनची ही प्रतीक्षा येत्या 22 जानेवारी रोजी संपणार आहे. या राम उत्सवानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याचाच एक भाग म्हणून रांजणगाव (शेणपुंजी) येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने गावातील सर्व मंदिरांची रंगरंगोटी करण्यात येऊन आकर्षक लाइटिंग लावण्यात येणार आहे. श्री संत सावता महाराज मंदिर, श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, सेवालाल महाराज मंदिर, दत्त मंदिर, श्री साई मंदिर, गणपती मंदिर. असे जवळजवळ 78 मंदिरं रांजणगाव (शेणपुंजी) येथे आहेत.
विशेष म्हणजे 22 जानेवारी रोजी सायंकाळी सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रात्री 8 ते 10 या वेळेत श्री संत सावता महाराज मंदिर येथे ह भ प रामायणाचार्य वैजीनाथ महाराज थोरात, हिंगोलीकर यांचे कीर्तन होणार आहे.
या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपणासाठी तीन ठिकाणी स्क्रीन लावण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
