March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.12) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील पाझर तलावास कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसल्यामुळे तसेच तलावातील पाणी दुर्गंधीयुक्त असून ते शेती उपयोगी व जनावरांच्याही पिण्याच्या लायक नाही. म्हणजेच शेतीसाठी व जनावरांसाठी हा पाझर तलाव उपयोगी तर नाहीच. या उलट तो धोकादायक आहे. त्यामुळे या पाझर तलावाला तार कंपाउंडसह सुशोभित करण्याची गरज आहे.

वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे सणाच्यावतीने 1980 मध्ये पाझर तलाव बांधला. त्यावेळी औद्योगिक वसाहत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना या तलावाचे पाणी अत्यंत उपयोगी होते. मात्र औद्योगिक वसाहत आल्याने येथील शेत जमीन कारखान्यास देण्यात आली.

परिणामी तलाव परिसरात अनेक लहान मोठे कारखाने उभे राहिले. शिवाय तलाव परिसरात नागरी वसाहती सुद्धा निर्माण झाल्या. रांजणगाव परिसरातील अनेक नागरी वसाहतीतील कचरा या तलावात आणून टाकला जात आहे. शिवाय परिसरातील अनेक कारखाने केमिकलयुक्त दूषित पाणी याच तलावात सोडत आहे. त्यामुळे बाराही महिने हा तलाव तुडुंब भरलेला असतो.

परिसरात शेती नसल्यामुळे तलावाचे पाणी शेतीसाठी वापरल्या जात नाही. शिवाय पाणी दुर्गंधीयुक्त असल्यामुळे जनावरही ते पीत नाही. तलावात गाळ साचून दलदल निर्माण झाल्याने या तलावात अनेक जण बुडून मयत झाले आहेत. असे येथील नागरिक सांगतात. नागरी वसाहत जवळ असल्याने शाळा सुटल्यानंतर अनेक मुले या तलावाजवळ खेळण्यास येतात. त्यांना पोहण्याचा मोह आवरता येत नाही. ही मुले पाण्यात उतरतात. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही.

शिवाय तलावात दलदल मोठ्या प्रमाणात आहे. त्यात मुले फसतात आणि त्यांचा करूण अंत होतो. त्यामुळे हा तलाव उपयोगी नाही. तो धोकादायक बनला आहे. त्यामुळे या तलावाला चारही बाजूंनी तारेचे संरक्षण
करून तलावाचे सुशोभीकरण करण्यात यावे. अशी मागणी होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *