
वाळूजमहानगर, (ता.7) – वाळुज जवळील येसगाव येथील जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दुरावस्था झाल्याने ती मोडकळी झाली आहे. या पडक्या व धोकादायक वर्ग खोल्यात शिक्षण घेणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून ज्ञानार्जनाची वेळ आली आहे. त्यामुळे येसगाव येथील ग्रामपंचायत, शालेय समिती, पालक व नागरिकांच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रास्ता रोकोचा इशारा देताच चार वर्ग खोल्यांना मंजुरी देण्यात आली.
येसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 1 ली ते 8 वी पर्यंत वर्ग आहे. या शाळेत विद्यार्थ्यांची संख्याही चांगली आहे. या विद्यार्थ्यांसाठी 6 वर्गखोल्या आहेत. त्यापैकी 2 षटकोनी खोल्या पावसाळ्यात गळतात. दोन खोल्याचे सन 1972 मध्ये बांधकाम झालेले असून त्या आता जुनाट होऊन मोडकळीस आल्या आहेत. दोन वर्ग खोल्या मोडकळीस आल्या आहेत. येथील एकूण 6 वर्गखोल्यापैकी 4 खोल्या जवळजवळ 15 वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे येसगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गखोल्या अभावी आज रोजी झाडाखाली बसून ज्ञानार्जन करण्याची वेळ आली आहे. परिणामी शिक्षकांना उघड्यावर धड (व्यवस्थित) शिकवता येत नाही. आणि विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे.
पंधरा वर्षापासून मागणी, तरीही दुर्लक्षच –
विद्यार्थी झाडा खाली शिक्षण घेतात, उघड्या वातावरणाचा व येणाऱ्या जाणाऱ्यांचा त्यांना त्रास होतो. त्यामुळे येसगाव येथील जिल्हा परिषद शाळेसाठी 4 नविन वर्गखोल्या मंजुर करण्यात याव्यात. यासाठी येसगाव ग्रामपंचायत, शालेय समिती, पालक व गावकरी 15 वर्षापासून पाठपुरावा करत आहे. मात्र सर्वांनीच दुर्लक्ष केले.
रास्तारोकोचा इशारा –
वेळोवेळी लेखी व तोंडी अर्ज देऊनसुद्धा येसगाव येथील जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन वर्ग खोल्या मंजूर होईना. त्यामुळे अखेर ग्रामपंचायत पदाधिकारी, शालेय समिती, पालक व गावकरी यांनी सोमवारी 1 डिसेंबर रोजी आमदार, खासदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, बांधकाम विभाग, गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, तहसीलदार गंगापूर, वाळूज ठाण्याचे पोलीस निरिक्षक आदींना पत्र देऊन विनंती केली की, येसगाव येथील जिल्हा परिषद शाळेसाठी त्वरीत 4 वर्ग खोल्या मंजुर करण्यात याव्यात. नसता सोमवारी 8 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर ते नगर-पुणे हायवेवरील लिंबे जळगाव येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिला होता.

इशारा देताच चार वर्गखोल्या मंजूर –
शाळेला नवीन वर्ग खोल्या देण्यात याव्या, नसता संतप्त गावकरी रस्ता रोको आंदोलन करणार या आशयाचे निवेदन हाती पडताच शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण आणि गंगापूर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अरविंद कापसे यांनी मागणी मान्य करून निधी उपलब्ध होताच येसगाव येथील 4 वर्ग खोल्या बांधकाम सुरु करण्यात येईल. असे लेखी पत्र 5 डिसेंबर रोजी देऊन रास्तारोको आंदोलन करण्यात येऊ नये. अशी विनंती केली आहे.
रास्तारोको आंदोलन तूर्तास स्थगित –
या लेखी पत्रामुळे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि पालक व गावकरी यांनी रास्तारोको आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे येसगावच्या सरपंच लक्ष्मीबाई जाधव व माजी सरपंच जगन्नाथ भराड पाटिल येसगावकर यांनी सांगितले.
