
वाळूजमहानगर, (ता.13) – एमआयडीसी व म्हाडा या दोन्हीच्या कचाट्यात अडकलेल्या वाळुज महानगरातील म्हाडा कॉलनी येथील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार कळवून सुद्धा कोणीही दखल घेत नसल्याने अखेर संतप्त नागरिकांनी बुधवारी (ता. 12) रोजी सायंकाळी अचानक हंडा मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्याने नागरिकांनी माघार घेतली.
वाळूज महानगर -1 जवळ म्हाडा कॉलनी ही नागरी वसाहत आहे. येथे अनेक नवीन नागरी वसाहती निर्माण झाल्याने येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गेल्यास सहा महिन्यापूर्वी या परिसराला म्हाडाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र त्यानंतर तो एमआयडीसी कडे आला. बिल भरायचे म्हाडाला आणि पाणी मिळवायचे एमआयडीसीकडून अशा दुहेरी कचाट्यात येथील नागरिक सापडले आहे. गेल्या काही महिन्यापासून येथील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. येथे बहुतांश नागरिक हे कामगार असल्याने दिवसभर ते घराबाहेर असतात. थकूनभागून घरी आल्यानंतर पाण्याची बोंबाबोंब ऐकून येथील नागरिक अधिकच खजिल होतात. येथील पाण्याच्या समस्याबाबत अनेकदा लेखी व तोंडी कळवून सुद्धा पाणी प्रश्न सुटला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी (ता. 12) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक हंडा मोर्चा काढला.
मात्र वाळुज एमआयडीसी पोलिसांनी मध्यस्थी करत ही मोर्चा काढण्याची वेळ नाही. तुम्ही सकाळी या आपण तोडगा काढू. असाच समज दिल्याने मोर्चेकऱ्यांनी वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे यांना निवेदन देऊन माघार घेतली. या मोर्चात अश्विनी मोटिंगे, प्रतिभा होले, शुभांगी लोखंडे, कविता तांगडे, संगीता साळुंके, कल्याणी गर्जे, आनंद दीडहाते, संतोष मोतींगे, राम चोथे, बाबासाहेब घाडगे, सुभाष पाटील, त्रिंबक कुलकर्णी, अमोल वाघमारे, दिगंबर मते, मनीष होले, गोविंद देठे, मंगेश लोखंडे तुमच्यासह नागरीकांचा मोठा सहभाग होता.
